ती खरंच पावसासारखी.
ती म्हणजे खरंच पावसासारखी.
ती म्हणजे खरंच पावसासारखी
थेंबा थेंबाने येते आणि आपल्याला व्यापून टाकते.
वरून दिसतो आपण कोरडेच
पण ती आपलं मनही ओलेचिंब करून जाते.

आपण पहात रहातो खिडकीतून रिमझिमणारा पाऊस पाणी,
पण तो पाऊस नसतोच मुळी त्या असतात तिच्या आठवणी.
आपल्याही नकळत आपण खिडकीतून हात बाहेर काढतो
आणि तिला तळहातावर घेतो. पुन्हा पावसात हरवून जातो.
तळहातावर ती, बाहेरही ती, आपणही स्वतःला झोकून देतो
आपल्याही नकळत खिडकीतून बाहेर जातो.
ती रिमझिमणारी सर, आपण मुसळधार पाऊस होतो.
तिच्यासह अवताल भवताल सारं सारं कवेत घेतो.
हिरवी राने, हिरवी पाने, हिरव्या वेली, हिरवी मने
हिरव्या हिरव्या हिरवाईतून टपटपणारी दोन जणे
कोणती ती आणि कोणता मी, ओळखत नाही आता कोणी
आई म्हणते, ” काय रे घरात आले कोठून पाणी ?”
दचकून तेव्हा मी माझ्या पायाशी पहातो
पाणी नसतेच तिथे मग भांबावून जातो
माझ्या चेहऱ्यावर उमटलेल्या तिला आई पहात रहाते
कुठल्यातरी कौतुकानं माझ्या हाती चहा देते.
खिडकीमधून रिम झिमणाऱ्या पुन्हा तिला पहात रहातो
चहावरची वाफ होतो खुशाल तिच्या कवेत जातो.
About this entry
You’re currently reading “ती खरंच पावसासारखी.,” an entry on रे घना
- Published:
- July 8, 2011 / 7:29 am
- Category:
- प्रेम कविता, ललित
- Tags:
- कविता, पाऊस, प्रेम, प्रेम कविता, मैत्री दिन, friedship day, love, love poem, marathi poem, poem, rain



1 Comment
Jump to comment form | comment rss [?] | trackback uri [?]