थ्री इडीयट्स आणि मैत्री
नाही, नाही म्हणता आज मी दोनदा लिहितोय. तेही मैत्री दिनाविषयी. कारण माझा या जगात कशावर विश्वास असेल तो परमेश्वरावर, प्रेमावर आणि मैत्रीवर. परमेश्वराची आराधना करावी लागते……….प्रेम हृदयातून यावं लागतं…….आणि मैत्री विश्वासाची हवी असते.
पण या तिन्ही पैकी एकही गोष्ट आपल्या पदरात पडत नाही तेव्हा आयुष्य वाटेवरचा दगड होतं. अनेकजण आपल्याशी ठेचाळतात आपल्याला शिव्या देत मागे टाकून पुढे निघून जातात.
आज थ्री इडीयट्स पाहत होतो. म्हणजे आज पहिल्यांदाच पहात होतो असं नाही. आधीही अनेकवेळा पाहिलंय. पण सात आंधळ्यांना प्रत्येकला हत्ती वेगवेगळा दिसावा तसा कोणताही सिनेमा मला प्रत्येकवेळी वेगवेगळा दिसतो. कारण मी प्रत्येकवेळी सिनेमातल्या वेगवेगळ्या पैलूशी समरस होतो.
आजवर वाटत होतं हा सिनेमा शैक्षणिक धोरणावर टीका करणारा आहे. पण आज पहिल्यांदाच त्यातला मैत्रीचा पैलू मला जाणवला आणि सिनेमा संपेपर्यंत तो प्रभाव टिकून राहिला. आजच्या ‘ फ्रेन्डशिप डे ‘ च्या दिवशी मैत्रीचं महत्व अधोरेखित करून गेला.
राजू, फरहान आणि रणछोड दास हे तिघे मित्र. नशेत तिघे प्रिन्सिपलच्या ( व्हायरस ) घरी जातात. प्रिया हि प्रिन्सिपलची मुलगी. रणछोड दास तिच्या प्रेमात पडलेला. तो त्याचं प्रेम तिच्याजवळ व्यक्त करतो. राजू आणि फरहान व्हायरसच्या दरवाजावर मुतून आपला राग व्यक्त करतात. पळून जाताना नशेत बरळतात. पकडले जातात. दुसऱ्यादिवशी प्रिन्सिपल राजूला केबिनमध्ये बोलावतात. त्याला कॉलेजमधून बडतर्फ केल्याचं पत्र त्यालाच टाईप करायला सांगतात.
राजू गयावया करतो. प्रिन्सिपल म्हणतात, ” ठीक आहे. तुझ्या जागी रणछोडचं नाव लिही.” आणि राजू मागे सरकतो. खिडकीतून उडी टाकून आत्महत्या करू पहातो.
मग त्याला वाचण्यासाठी रणछोडनं केलेली धडपड, रणछोडला शोधून काढण्यासाठी राजूनं आणि फरहाननं केलेला आटापिटा, रणछोडच्या जिवाभावाच्या प्रियाला भर मांडवातून पळवून नेणं, राजू पास व्हायला हवा म्हणून प्रिन्सिपलच्या कस्टडीतून प्रश्नपत्रिका चोरणारा रणछोड आणि फरहान……….बस्स सगळीकडे फक्त मैत्रीच मैत्री. आहे आपल्या कुणाच्या नशिबी अशी मैत्री. आयुष्यात सारं काही विकत घेता येतं…….विकत घेता येत नाही ते प्रेम आणि मैत्री.
तो सिनेमा होता असं कुणी म्हणू नये. कारण आपल्यालाही सिनेमासारखच आयुष्य हवं असतं. सिनेमातल्यासारखीच हिरोईन आपल्यालाही हवी असते………… आपल्यालाही अन्यायाचा प्रतिकार करण्याची इच्छा असते………..आपल्यालाही कोणत्याही कठीण प्रसंगी सोबत करणारा मित्र हवा असतो. ते सारं आपल्या वाट्याला येत नाही म्हणून आपण सिनेमाशी एकरूप होतो.
म्हणूनच आजच्या स्वतःच्या उन्नतीसाठी एकमेकांचे पाय ओढू पहाणाऱ्या जगात अशा निष्पाप……निरागस मैत्रीला मनापासून सलाम.
About this entry
You’re currently reading “थ्री इडीयट्स आणि मैत्री,” an entry on रे घना
- Published:
- August 7, 2011 / 11:43 pm
- Category:
- लेख, सामाजिक , राजकीय
- Tags:
- थ्री इडीयट्स, प्रेम, मराठी कविता, मैत्री, मैत्री दिन, सामाजिक, friedship day, marathi poem


No comments yet
Jump to comment form | comment rss [?] | trackback uri [?]