स्त्री भ्रुण हत्या आणि सुप्रिया सुळेंची पदयात्रा
मुलगी असेल तर जन्माला येण्या आधीच तिची हत्या करण्याची समाजाची मानसिकता अजूनही थांबत नाही. माझ्या घरात तसं घडतं………माझ्या शेजारी तसं घडतं………….माझ्या ऑफिसातही अशा घटना घडतात. मला घटना घडल्या नंतर कळतं. मी त्याविषयी काहीच बोलत नाही. मला दोन्ही मुलंच आहेत असं सांगितल्यानंतर, ” दोन्ही मुलंच का ? मजा आहे बुवा तुमची. ” असं म्हणणारी मंडळीही मला भेटतात. अशा वेळी काय करावं कळत नाही.
पण माझ्या धाकट्या बंधूंना दोन्ही मुलीच आहेत. एकाच मुलीवर थांबलेले माझे मित्रही आहेत. तीन मुलं असताना मुलगी हवीच म्हणून देवाला नवस करणारी आणि चौथं मुल होऊ देणारी माझी आई आहेच. मुलीची खूप आस बाळगली होती म्हणून माझ्या आईनं पाळण्यात न घालता तिचं नाव आशा ठेवलं. घरात मी थोरला. मला दोन्ही मुलंच झाली तेव्हा मला, ” एक मुलगी होऊ दे ना रे विजय.” अशी गळही मला माझ्या आईनं घातली. पण मी थांबलो कारण आजच्या महागाईच्या जमान्यात तिसरं मुल संभाळण म्हणजे तारेवरची कसरत.
हे सगळं सांगण्याला कारण घडलं. गेली दोन दिवस माझ्या ऑफिसच्या रस्त्यावरून सुरु असलेली सुप्रिया सुळेंची पदयात्रा मी पहातो आहे.
मागे पुढे पोलिसांचा भला मोठ्ठ ताफा…………रस्त्यावर ठिकठिकाणी झळकणारे ताडमाड फ्लेक्स पदयात्रेत सहभागी झालेल्या ( स्वखुशीने कि आदेशाने माहित नाही ) हजारभर शाळकरी मुली. मुंबई बेंगलोर सारख्या राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूला सहासात किलोमीटर पर्यंत रखडलेली वहाने. रस्त्यात ठिकठिकाणी चाललेले सत्कार………….हार तुरे ………..मुठभर पांढऱ्या शुभ्र मिशा ओठावर मिरवत सुप्रिया सुळेंच्या पायाशी वाकणारी मंडळी……….क्षणभराचा सत्कार झालाकी तुंबलेल्या वहानांच्या रांगेकडे पहात, ‘ आमची गाडी तेवढी काढून द्या. ” असं पोलीस अधिकार्याला फर्मावणारे पांढऱ्या खादितले पुढारी………..पुढारी पोलीस अधिकाऱ्याला साहेब म्हणत नाही. पण पोलीस अधिकारी मात्र ‘ होय साहेब ‘ म्हणत तुंबलेल्या वहानांच्या रांगेवर चवताळून जाणारे पोलीस अधिकारी. हे सारं स्त्री भ्रुण हत्या थांबविण्यासाठी कि केवळ एक स्टंट म्हणून. कारण चारसहा वर्षापूर्वी कोण ओळखत होतं या सुप्रियाला. पण आज तिच्या समोर चाललेली थोर मोठ्यांची आणि पोलीसखात्याची लगबग पहिली कि वाटतं सत्तेसमोर शहाणपणही चालत नाही आणि थोरपणही.
About this entry
You’re currently reading “स्त्री भ्रुण हत्या आणि सुप्रिया सुळेंची पदयात्रा,” an entry on रे घना
- Published:
- August 27, 2011 / 6:22 am
- Category:
- लेख, सामाजिक , राजकीय
- Tags:
- आण्णा हजारे, मुलगी, राजकारण, राजकीय, सामाजिक, सुप्रिया सुळे, स्त्री भ्रुण हत्या




3 Comments
Jump to comment form | comment rss [?] | trackback uri [?]