इटाळ

परवा गावी गेलो होतो. तुम्ही म्हणल हा बाबा नेहमीच परवाच गावी कसा जातो. चार दिवसापूर्वी………आठ दिवसापूर्वी……काल अशा दिवसांपूर्वी हा कसा गावी जावून आलेला नसतो. आटपाट नगरच्या गोष्टीत कसं नेहमीच म्हणतात.” फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आटपाट नावाच एक नगर होतं.” तसं गाव म्हणजे काय याचं आटपाट नगर आहे काय ? नाही माझं गाव अगदी आत्ताचं आहे.

असो. ते काही फार महत्वाचं नाही. सांगायचं ते एवढच कि मी गावी गेलो होतो.

चुलत बहिण खराताला दिलेली. ती तिच्या मुलाबाळासह तिथच आमच्या वाडीत आमच्या घराजवळ रहायची. मी रानातून घराकडं निघालेलो. तिच्या घरासमोरून जाताना पाहिलं तर आई तिथच बसलेली.

गावाकडच्या आमच्या शेतात तुळजाभवानीच जागृत स्थान आहे. त्यामुळं पुण्याहून गावी जाताना मी नेहमीच तिला वाढवायला नारळ घेवून जातो. त्या दिवशी मंगळवार होता. मी देवळात जावून देवीला नारळ फोडणार याची आईला जाणीव होती. तेव्हा आई मला म्हणाली,
” अरे विजय, देवीला नारळ वाढवू नकोस हं.”
” का गं ? ” मी.
” अरे आपल्याला विटाळ आहे.”
” कसला ?”
” अरे, ती बाप्पुची सून बाळंत झालीय पहाटे. ”
” बरं ठीक आहे. मी बेलवंडीला जावून येतो.” मी.

” कुठनं जाणार हाईस रं इज्या ? ” चुलत बहिण.
” तुला कुठं जायचं ? ”
” आरं, मला देवाला, केसबाबाला जायचं. नारळ वाढवायचाय.”
” चल, तुला सोडवून तसाच पुढं जाईन.”

तिनं नैवेद्य घेतला. पाण्यासाठी तांब्या घेतला. केसबाबाच्या अलिकड एक विहीर होती.
” इज्या थांब जरा. पाण्याचा तांब्या घेउदे भरून. ”
” अगं मग आपल्या विहिरीवरून का नाही घेतलास भरून. या विहिरीच्या पायरया पाहिल्यास का किती लांब लांब आहेत ?”
” आरं, तुम्हाला इटाळ हाय. तवा शेंड्ग्यांच्या हिरीचं पाणी नाही चालत मला.”

तिनं पाण्याचा तांब्या भरून घेतला. आम्ही केसबाबाच्या देवळाजवळ पोहचलो.
” थांब जरा इथं वाटवर.”

मी वाटेवर थांबलो. तिची अगदी निवांत साग्रसंगीत पूजा सुरु झाली. मी आपला उन्हात तळपत उभा. एक दोन वेळा ती म्हणाली, ” आरं, सावलीला तरी थांब. ”
” नको,  नको. काही होत नाही मला.” म्हणत मी काही सावलीचा आसरा घेतला नाही. हेतू एवढाच कि मी असा उन्हात तळपत उभा आहे हे पाहून तिनं तिची पूजा उरकती घ्यावी.

पण नाही. मला तर खरं घाई होती. एका अधिकाऱ्याला भेटायचं होतं. जवळ जवळ पंधरा मिनिटं तिची पूजा चाललेली. पूजा संपवून माझ्याजवळ येत ती म्हणाली,
” आता असं कर. ”
” कसं ?”
” असाच माघारी चल. वस्तीवर नको येउस. पण त्या फराट्याच्या मळ्यापतूर मला सोड. आन मग जा तसाच मधून.”

मी पुन्हा तिला घेवून माघारी निघालो. फराट्याच्या  मळ्यापर्यंत आलो आणि तिला म्हणालो,
” का घरीच सोडू तुला ? किती वेळ लागणार आहे मला ? फार तर जायला पाच मिनिटं आणि यायला पाच मिनिटं.”
” बरं होईल बाबा.”

मी तिला घरी सोडवायला निघालो. पण मनात खळबळ माजली होती.

शेंडग्यांना विटाळ आहे म्हणून देवासाठी तिला आमच्या विहिरीचं पाणी चालत नाही. पण देवाच्या वाटेवरचा प्रवास मात्र त्याच विटाळाच्या घरातल्या गाडीवर आणि माणसासोबत केलेला चालतो. पण त्याही पेक्षा महत्वाचा म्हणजे आमच्या वस्तीपासून पाच पन्नास किलोमीटर दूरवरच्या दवाखान्यात बाळंत झालेल्या बाईचा विटाळ आमच्या विहिरीपर्यंत पोहोचतोच कसा ?

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s