निवृत्तीचं वय…..

आमच्या इथं लोकशाही आहे. आम्ही मतदान करून आमचे प्रतिनिधी म्हणून नगरसेवकांपासून पार अगदी आमदार खासदारांपर्यंत अनेकांना निवडून देतो. आणि हि मंडळी लोकहित पहाण्याऐवजी फक्त स्वतःच हित पहाण्यात मश्गुल होऊन जातात. जनकल्याणाच्या नावाखाली राबविलेल्या प्रत्येक योजनेत हे फक्त स्वतःची तुंबडी भरून घेतात. मग कधी हा स्वार्थ पैशांच्या रुपात असतो तर कधी मतांच्या रुपात.

परवा परवाच ” शासनाकडून आलेली योजना जर शंभर रुपयांची असेल तर त्यातले फक्त १६ रुपये जनतेपर्यंत पोहचतात “, हे किरण बेदींच विधान वाचलं.

खूप खूप वर्षापूर्वी स्वर्गीय राजीव गांधीनीही याच आशयाचं विधान केलं होतं. ते म्हणाले होते, ” जब मै यहा से १०० रुपये भेजता हूँ , तो उसमे से केवल १ रुपया जनताके पास पहुँचता है. ”

काही वर्षापूर्वीच शासनान निवृत्तीचं वय ६० वर्षावरून ५८ वर्षावर आणलं होतं. रोजगार निर्माण होण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलाय. असं त्या निर्णयाचं समर्थनही केलं होतं.

आणि आता पुन्हा परवाच वर्तमान पत्रात वाचलं प्रोफेसर आणि प्राचार्य या दोन्ही वर्गातील सेवकांच वय ६२ आणि ६५ वर्ष वयापर्यंत वाढवण्यात आलाय.

कशासाठी विचारलं तर हे म्हणणार, ” वाढत्या वयाबरोबर वाढणाऱ्या अनुभवाचा लाभ तरुण पिढीला मिळावा म्हणून.”

मागील वर्षीच आमच्या शिक्षण मंत्र्यांनी आठवी पर्यंत परीक्षा नको. असं निर्णय घेतला. त्याचं काय फलित नशिबी येणार आहे ? कुणास ठाऊक ! किंवा फलित हाती येई पर्यंत सदर महाशय मंत्री पदी नसतीलही. एकूण काय निर्णय घेणार हे आणि फळं भोगणार आम्ही.

कशासाठी या प्रोफेसरांच आणि प्राचार्यांच निवृत्तीचं वय वाढवायला हवं होतं ? अहो, आमचा एसएससी आणि एचएचसीचा निकाल लागतो जेमतेम ७० टक्क्या पर्यंत. आणि क्लासला जाणारी मुला असतात जवळ जवळ ८० टक्क्या पर्यंत.

या आकडेवारीनंतर कुणी म्हणेल, ” मग हव्यात कशाला शाळा आणि प्राचार्य…………… कॉलेज आणि प्रोफेसर.”

आणखी कुणी म्हणेल, ” क्लासला जाऊन मुलांना बसु द्या ना सरळ परीक्षेला.”

पण नाही राष्ट्राच्या घडणीत त्यांचं स्थान नजरेआड करून चालणार नाही.

मला अजूनही आठवताहेत……….चौथी गेलेल्या आम्हा टोणग्यांना ( तेव्हा असाच शब्द प्रयोग वापरला जायचा. आता काळ बाह्य झालाय.) हाताला धरून लिहायला शिकवणारे धुमाळ गुरुजी.

मला अजूनही आठवताहेत……….बारावीला आम्हाला जीव तोडून फिजिक्स शिकवणारे देशमुख सर.

त्यामुळंच आमच्या समाज व्यवस्थ्येतल्या या वर्गाचं महत्व अन्यान साधारण आहे.

आता प्रश्न उरला तो निवृत्तीच्या वयाचा.

मला वाटतं कुठल्याही कुटुंबातील पुढची पिढी अर्थार्जन करायला लागेपर्यंत त्या कुटुंबातल्या कुटुंब प्रमुखाला कष्ट करणं भागच आहे.

कोणत्याही जोडप्याला उशिरात उशिरा साधारणपणे वयाच्या तिशीत ( स्त्री किंवा पुरुषात प्रजनन क्षमतेच्या बाबतीत वैगुण्य नसेल तर निसर्ग नियमानुसार हे विधान चूक नसावं ) मुल झालं असेल तर, ते मुल त्याच्या वयाच्या पंचविशी पर्यंत अर्थार्जन करू लागतं. आणि पुढच्या एक दोन वर्षात स्वतःच्या पायावर उभं रहातं. पुढच्या वर्ष दोन वर्षात ते बोहल्यावरही चढतं. म्हणजेच त्या गृहस्थांच्या वयाच्या ५८ ते ६० वर्ष पर्यंत त्या गृहस्थांची पुढची पिढी त्यांना आधार देण्या इतपत सबल आणि सक्षम झालेली असते.

त्यामुळेच निवृत्तीचं वय ५८ ते ६० वर्ष या पेक्षा अधिक नसावं हे निश्चित. या उपर कुणाला सेवेत रहायचं असेल तर त्यांनी विना मोबदला निश्चित रहावं.

माझं काही चुकत असेल तर नक्की सांगा.

1 Comment

Leave a reply to मनोहर Cancel reply