गांधी सरले, बाबा उरले

महात्मा गांधी. कधीही विसर न पडावा असं स्वातंत्र्य लढ्यातल एक नाव. साऱ्या जगाला अहिंसेचं शहाणपण शिकवणारं एक वादळ. स्वातंत्र्य मिळालं आणि सगळ्या सरकारी कचेऱ्यात ते जावून बसलं. तिथून हळू हळू हद्दपार होऊ लागलं. ती जागा आता इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी व्यापू लागलेत.

२ ऑक्टोंबर महात्मा गांधींची जयंती. कुठे आणि कशी साजरी होते कुणास ठाऊक. कुणी म्हणेल महाराष्ट्रात नसेल साजरी होत. अहमदाबादेत, गुजरातला जाऊन बघा. पण महात्मा गांधी राष्ट्रीय युगपुरुष. त्यांची जयंती संपूर्ण राष्ट्रात का नाही साजरी होत ? कि राष्ट्रीय सुट्टीची मजा मारली, ड्राय डे ??? साजरा केला कि झाली गांधी जयंती साजरी ?

बरं गांधी गुजरातचे त्यामुळे त्यांची जयंती महाराष्ट्रात साजरी होत नसेल असं म्हणावं तर आमच्या महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांची जयंती तरी कुठे साजरी होते ?

असो. काल १४ एप्रिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. संध्याकाळी शहरात खूप फिरण्याची वेळ आली. संध्याकाळी सहा वाजता घरातून बाहेर पडलेलो. घरी यायला साडेनऊ वाजले. गल्लीगल्लीत निळ्या पताकांची तोरणं दिसत होती. स्पीकर दणाणत होते. गाणी वाजत होती. चौकाचौकात पोरं स्पिकरच्या तालावर नाचत होती. शीलाच्या जवानीपासून बदनाम झालेल्या मुन्नीच्या गाण्यापर्यंत अनेक गाणी वाजत होती. आणि या साऱ्यांच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेब सारं पहात मूकपणे उभे होते.

हे सारं पहाताना, ” यासाठीच का मी सारा जन्म वेचला.” असं बाबासाहेबांना नक्कीच वाटलं असेल. असं माझ्या मनात आलं.

आज संध्याकाळी असाच बाहेर गेलो होतो. एका चौकात भला मोठा ब्यानर लावलेला. साडेसात आठची वेळ. रस्त्यावर दिवे होते पण ब्यानरवरचा छोट्या अक्षरातला मजकूर वाचण्यासाठी पुरेसा उजेड नव्हता. पण त्याच्यावरची –

” नाद करायचा नाय ”

हि अक्षर सहज दिसत होती.

तिथून जवळच एक स्टेज होतं. त्यावर चांगली कलरफुल लायटिंग केलेली. मी थोडावेळ तिथ घुटमळलो.
” मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा ” या गाण्यावर कुण्या फटाकडीचा नाच चालला होता. आमच्या नगरसेवकांना आता असे कार्यक्रम आयोजित करायचा भलताच नाद लागलाय. महिन्या पंधरा दिवसातून कुठ ना कुठ असा कार्यक्रम असतोच. त्यामुळेच हा कार्यक्रम नेमका कशासाठी आयोजित केलाय हे जाणून घ्यायची मला उत्सुकता लागली होती.

मी गाणं बाजूला ठेवलं त्या बोर्डाच्या जरा जवळ गेलो. खालच्या बाजूला लिहीलं  होतं –

” नाद करायचा नाय ”

डॉ. बाबासाहेब जयंती निमित्त आज रात्री ठीक ७.३० वा.

कुठही सभा, मेळावे, व्याख्यानं त्यातून होणारा विचार मंथन दिसलं नाही. पण आज वर्तमान पत्रात हेडिंगला बातमी –

‘ देशभर बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी. ठीकठिकाणी सभा, मेळावे, व्याख्यानं आयोजित. ‘

मी पाहिलेली आणखी एक घटना फारच खेद जनक होती. एका चौकात अशीच अनेक मंडळी नाचत होती. कडेच्या रस्त्यावरून वहानं वहात होती. नाचणाऱ्या मंडळीत अनेकांनी शेर पावशेर लावलेली होती. त्यांचा तोल जात होता. एकजण तोल जाऊन कडेनं हळू हळू पुढे सरकणाऱ्या वाहनावर पडला. झालं नाचणारी सगळी मंडळी गाणं विसरली. सारे त्या वाहनाभोवती जमा झाले. वाहन चालवणाऱ्या माणसाला दमदाटी करू लागले. बाबासाहेब काय वाटलं असेल तुम्हाला हे सारं पाहून ?

एक गोष्ट आताच स्पष्ट करतो कि मी काही कोणी फार मोठा उच्चवर्णीय नाही. मीही असाच समाजातल्या खालच्या स्तरातून वर आलो आहे. मुळातच माझा माणसातल्या माणुसकीवर जेवढा विश्वास आहे तेवढा जातीव्यवस्थ्येवर नाही. गांधी मोठे कि बाबा ? असंही काही मला म्हणायचं नाही.

मला म्हणायचं ते एवढंच कि, ” महात्मा गांधींचा विसर साऱ्या जगाला पडला तरी हरकत नाही पण काँग्रेसला असा विसर पडून चालणार नाही. कारण आज स्वातंत्र्यानंतरच्या साठ बासष्ट वर्षापैकी जवळ जवळ ५५ वर्ष या देशावर राज्य केलंय ते कॉंग्रेसन आणि त्या मागे पुण्याई आहे ती महात्मा गांधींची.” पण जित्या जागत्या नेतृत्वावरही फारशी निष्टा न दाखवणारं आजचं राजकारण. फक्त स्वतःचा स्वार्थ पाहणारं. भ्रष्टाचारानं पोखारलेलं  . कॉंग्रेसला यापुढे गांधीजींचं फारसं स्मरण होईल असं मला वाटत नाही.

हे सारं लिहिण्यामागे हेतू एवढाच कि यापुढे तरी माझ्या तमाम दलित बांधवांनी डॉ. बाबासाहेबांची जयंती चांगल्या आणि विधायक मार्गाने साजरी करावी.

Advertisements

4 Comments

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s