सोनियाच्या स्वप्नात महात्मा गांधी

गेली पाच सहा दिवस खूप धावपळीत गेले. गावी गेलो होतो. भुईमुग काढायचा होता. शेतावर कुठली आलीय नेट. पण अण्णांचं आंदोलन जवळून ( टिव्हीवर ) पहात होतो. लिहायचं खूप मनात होतं पण लिहू शकलो नाही. अण्णांच्या आंदोलनाच्या संदर्भात अनेक यसएमयस येत होते. त्या काहीशा टुकार भाषेतील यसएमयस वरून लिहिलेला हे कल्पित लेखन.

**************************************************************************
एक दिवस महात्मा गांधी सोनिया गांधींच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, ” मरताना मी काँग्रेसला माझी टोपी , माझा चष्मा आणि माझी काठी दिली होती. कुठे आहेत त्या सगळ्या वस्तू ? ”

त्यावर सोनिया गांधी म्हणाल्या, ” टोपी तर आम्ही जनतेला घातली……….चष्मा मनमोहन सिंगांना दिला…………आणि काठी अण्णा हजारेंच्या हाती दिली होती.”

त्यावर महात्मा गांधी म्हणाले, ” ठीक आहे. जनतेला टोपी घालून तुम्ही माझ्या जनसेवेच्या व्रताला टोपी घातली आहे हे मी पहातो आहेच. माझा चष्माही मनमोहन सिंगांच्या डोळ्यावर दिसतो आहे. त्या चष्म्याच्या आतले डोळे आंधळे आहेत हे हि आता कळून चुकलंय. पण अण्णांनी काठीचं काय केलंय ?”

यावर सोनिया गांधी बारीक आवाजात म्हणाल्या ” काय हे बापुजी. चष्म्याशिवाय तुम्हाला दिसत नाही हेच खरंय. नाही तर आम्ही अण्णांच्या हाती दिलेली तुमची काठी अण्णांनी आमच्याच माथी हाणून आम्ही किती नाठाळ आहोत हे साऱ्या जगाला दाखवून दिल्याचं तुम्हाला दिसलं नसतं का ? ”

महात्मा गांधींनी झटकन सोनिया गांधींच्या स्वप्नातून पळ काढला आणि तडक स्वर्गात पोहचले. स्वर्गातून रामलीला मैदानावर एक नजर टाकली आणि तिथला सोहळा पाहून –

” रघुपती राघवा राजाराम पतित पावन सीताराम ”

हे त्यांचं प्रिय भजन गुणगुणू लागले. हेतू एवढाच कि काँग्रेसला सद्गती मिळावी. अण्णा हजारेंना उपोषण करायला लावलेला पापातून मुक्ती मिळावी. पण कॉंग्रेसचा झालाय कंसा सारखं. त्यांच्या पापाचा घडा भरलाय. नुसता भरलाय असा नव्हे तर भरून उतू चाललाय. आता त्यांचं पतन हे नक्कीच.

Advertisements