शेजारची आई

मागच्या दिड एक महिन्यात शेताहून हलूच शकलो नाही. नव्यानं दिड एकर उसाची लागवड केली. चार एकर खोडवा आहेच. दिड एकर भुईमुग लावला. चारपाच दिवसापूर्वीच एकरभर भेंडी लावली. आणि दुसऱ्याच दिवशी सपाटून पाऊस पडला. दोन तासाच्या पावसानही ओढे टाकोटाक नाही तरी अर्धे मुर्धे भरले. आता महिनाभर पाण्याची भ्रांत उरली नाही. पाऊस पडला गुरवारी पण आज सकाळपर्यंत रानं ओलीकच्च होती. गड्यांना आणि त्यांच्या बायकांना पुढल्या तीनचार दिवसांचं नियोजन सांगितलं आणि पुण्याची गाडी पकडून घराकडे निघालो.

रेल्वेचा प्रवास मला फार आवडतो. खुल्या मनानं सभोवार पाहिलं कि समोर चलचित्र सुरु असल्यासारखं वाटतं आणि मी त्यात रमून जातो. माझ्याही नकळत त्या चलचित्रातलं एक पात्र होतो.

माझ्या गावाकडच्या स्टेशनवर चार सहाच माणसं गाडीत चढतात उतरतात. सगळ्या मिळून दिवसभरात पुण्याकड येणाऱ्या चारच गाड्या तिथ थांबतात.  तरीही चारसहा रुपयाच्या आशेनं वर्तमान पत्र विकणारा स्टेशनावर येतो. तो दिसल्या दिसल्याच मी वर्तमानपत्र विकत घेतलं. गाडीत जागा मिळताच डोळ्यासमोर धरलं. आणि लक्षात आलं आज मातृदिन. दैनिक सकाळची आख्खी पुरवणी त्याच विषयावर.

माझ्या अवतीभवती साऱ्या आयाच बसलेल्या. मी निरीक्षण करीत होतोच. माझ्या अगदी समोर एक चाळीशीच्या पुढचं जोडपं. त्यांच्या शेजारी दोन आया. त्या दोघीच्या पलीकडून आणखी एक आई. तिच्या मांडीवर एक तळहाता एवढ बाळ. बाळाची आजी बसायला जागा नसल्यामुळे उभीच. माझ्या शेजारी त्या जोडप्याच्या शेजारी बसलेल्या आयांची तीन पोरं. त्यांच्या शेजारी आणखी एक पोर आणि त्या पोराच्या पलीकडे त्याची आई. त्या क्षणी एवढंच माझ्यासमोरच जग.

जोडप्याच्या शेजारच्या दोन्ही आया गप्पात रंगून गेलेल्या. कोपऱ्यातल्या बाळाच्या आजीनं वाट पहिली पहिली आणि त्या तीन पोरातल्या एका पोराला मांडीवर बसण्याचं आमिष दाखवून जागा मिळवली. पोराचा दंगा वाढला कि जोडप्याच्या शेजारच्या दोघींमधली एक आई गप्पांचा रंग जातोय म्हणून पोरांवर ओरडायची. पोरंच ती……….दटावून किती वेळ गप्पं बसणार. शेवटी त्यातला सर्वात लहान पोरगा हिरमुसल होऊन म्हणाला,
” आई मला झोप आलीय.”

” मग सरक मागं आणि झोप टेकून. ” आपल्या गप्पांचा विषय आपल्या हातून निसटणार नाही याची दक्षता घेत ती म्हणाली.

मला प्रश्न पडला या आईला आपल्या मुलाला मांडीवर घेवून निजवाव असं का नाही वाटलं ?

” नाही तू जवळ हवीस.” या क्षणी त्या पोराला आईची गरज होती. मातृत्वाची उब हवी होती.

” अरे गाडीत जागा आहे का ?”

” मांडीवर घे.”

मुला सोबतच्या संवादात अधिक वेळ जायला नको आणि आपल्या गप्पांचा धागा आपल्या हातून सुटायला नको म्हणून त्या बाईन पोराला स्वतः जवळ बसवून घेतलं. त्याचा डोकं एका मांडीवर टेकू दिलं आणि ती पुन्हा गप्पांकडे वळली. तेव्हा ती माझ्या समोर बसलेल्या त्या जोडप्यातली बाईच म्हणाली, ” अहो मान अवघडेल त्याची.मांडीवर घ्याना.”

” अहो पण जागा कुठ आहे ?”

प्रश्न जागेचा होता कि त्या बाईला मुलाला मांडीवर घ्यायचं नव्हतं हे वाचकांनीच ठरवावं. पण त्या जोडप्यातली बाई सावरून बसली. आणि तिला म्हणाली,.” ह घाला आता मांडी आणि घ्या त्याला मांडीवर.”

आता मात्र त्या बाईचा नाईलाज झाला आणि तिनं मुलाला मांडीवर घेतलं. पुन्हा गप्पांकडे वळली. मुलाची कुरकुर चालूच होती. त्या बाईच्या गप्पाही चालूच होत्या. शेवटी माझ्या समोरबसलेल्या जोडप्यातल्या बाईमधली  आई जागी झाली. तिनं तिच्या पर्सचे सगळे कप्पे चापसले आणि हाती लागलेलं एकमेव चॉकलेट त्या पोराच्या हातावर ठेवलं आणि मग ते पोरगं शांत झालं.

माझ्या मनात निर्माण झालेले प्रश्न असे –

१) त्या बाळाच्या आजीला जागा नव्हती तेव्हाच या बाईला आपल्या मुलाला स्वतः जवळ बसवून त्या आजींना जागा करून द्यावी असं का नाही वाटलं ?

२) सोबत असलेल्या बाई बरोबर ( भले मग ती तिच्या कितीही जवळची असो ) गप्पा मारण्यापेक्षा आपल्या मुलांना दोन्ही बाजूला बसवून घेवून त्यांच्याशी बोलावं त्यांना बोलतं करावं असं का नाही वाटलं ?

३) आपल्या आईपेक्षा ती शेजारची काकूच चांगली आहे असं तर त्या मुलाला वाटलं नसेल ना ?

कुणी म्हणेल मी राईचा पर्वत करतोय. आज मातृदिनी मातृत्वाचा सन्मान करण्याऐवजी असं का लिहावं या माणसानं ? या माणसाला स्त्रीच्या आईपणाबद्दल आस्थाच नाही का ?

तसं कुणाला वाटणार असेल तर आधीच हे आधीच स्पष्ट करतो कि

आईनं आईपण नाकारलं तर प्रत्यक्ष ईश्वराच्या अस्तित्वालाही आकार येणार नाही.

नवी कविता टाकायची होती पण ती kmnpoj करायला वेळ नाही. रात्रीचे बारा वाजलेत. मातृदिन सरलाय.म्हणूनच मी मागच्या वर्षी मातृदिना दिवशी टाकलेली कविताच आज पुन्हा टाकतो आणि आईतल्या ईश्वराला नमस्कार करून थांबतो.

आईनं आईपण नाकारलं तर प्रत्यक्ष ईश्वराच्या अस्तित्वालाही आकार येणार नाही.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s