असा मी……असाही मीच

असामीकुणाला वाटेल मला पुलंच्या ‘ असामी ‘ बद्दल लिहायचं आहे. पण नाही. पुलंच्या ‘ असामी असामी ‘ बद्दल टीका टिपण्णी करण्या इतपत मी मोठा नाही.

यातली छायाचित्र पाहिल्यानंतर तुम्हाला माझ्या विषयाचं गांभीर्य पटेल. माणूस स्थित्यंतर प्रिय आहे. किंवा असंही म्हणता येईल माणसाला त्याच्यातली स्थित्यंतरं प्रिय असोत व नसोत त्याच्यात घडणाऱ्या स्थित्यंतराचा स्वीकार त्याला करावाच लागतो.

आता माझंच पहाना. काही महिन्यापूर्वीचा मी प्रोडक्शन म्यानेजर. एका बहुदेशीय कंपनीत माझ्या कामात व्यस्त असणारा. वीस बावीस लोकांची टीम सांभाळणारा. केबिन….संगनक……प्रोडक्शन शेडूल…….मंथली टार्गेट…….डीस्प्याचेस…….ऑर्डर लाईन…….प्रोसेस डेव्हलपमेंट………लाईन ब्यालांसिग……….सप्लायर डेव्हलपमेंट………..कामगार……..घड्याळाचे काटे विसरून केलेली पळापळी……..धावाधाव………….आणि सरतेशेवटी हाती पडणारा मोजका पगार. कितीही काम केलं तरी तेवढाच आणि नाही केलं तरी तेवढाच. या सगळ्या चक्रव्यहुत फसलेला. त्या सगळ्यात स्वतःला झोकून देणारा. मूल्यमापन कसलं ते नाहीच. मी आपला नुसता कमांडरच्या सांगण्यानुसार सीमेवर छातीवर गोळ्या झेलणाऱ्या सैनिकासारखा छातीवर गोळ्या झेलत राहिलो. मेडल्स इतरांच्याच पदरी पडले.

पण हे सारं खूप आनंदानं सोसलं. कंपनीच्या भरभराटीस आपला हातभार लागतो आहे यात आनंद मनात राहिलो. कंपनीच्या भराभराटीबरोबर कधीतरी आपलीही भरभराट होईल असा आशावाद बाळगत राहिलो. आणि जवळ जवळ अठरा वर्षांनतर कर्णानं आपली कवच कुंडलं कृष्णाच्या स्वाधीन करावीत इतक्या सहजतेन राजीनामा देऊन बाहेर पडलो.असाही मी

एक नवी वाट पत्करली. शेतीची. जिथं माझ्या कष्टाचं मोल ठरवणं केवळ ईश्वराच्या आणि निसर्गाच्या हाती आहे. इथं गरज आहे ती फक्त कष्टाची. लाळघोटेपणाची किंवा हुजरेगिरीची नाही. मी श्रमालाच ईश्वर मानतो. त्यामुळेच मी कष्टाला कधीच घाबरत नाही.

मी नौकरीला कंटाळून शेती करायचा निर्णय घेतला असं कुणी समजत असेल ते मात्र साफ चुकीचं आहे. वडील असे अकाली निघून गेले नसते तर मला शेतीकडे पहायची गरजच पडली नसती. वडीलांपाठी निराधार झालेल्या शेतीकडे खरंतर मीही दुर्लक्ष करू शकलो असतो. मारून मुटकून हुजरेगिरी करत राहिलो असतो. शहरातला एषआराम उपभोगत राहिलो असतो. पण गेली वीसहून अधिक वर्ष पडीक असलेली आमची शेती माझ्या वडिलांनी गेल्या पाच सहा वर्षात खूप मेहनतीनं उभी केली होती. वडीलांपाठी ती पुन्हा ओस पडली असती तर निवृत्तीनंतर शहरातल्या तमाम सुखांना लाथ मारून गावाकडे जाऊन वडिलांनी जे कष्ट घेतले होते त्या कष्टाची माती झाली असती. आणि मला ते होऊ द्यायचं नव्हतं.

नव्या वाटेवर पाऊल टाकलं. माझी शेती मीच बघू लागलो. सुरवातीला हाताखाली कुणीच नाही. एकटाच. अंधाराचं……काट्याकुट्याचं…….चोराचिलटाचं….इचू काट्याचं कसलंही भय न बाळगता. रात्री अपरात्री कासराभर उजेड फेकणारी विजेरी घेवून शेतात जायचो. आभाळातल चांदणं पहात भर शेतात मातीत अंग टाकून द्यायचो. कुठूनतरी साप येईल …….विंचू येईल असं कसलंच भय वाटायचं नाही.

दोन तीन महिने गेले. आणि दोन वाघ माझ्या सोबतीला आले. देविदास सोनावणे आणि भगवान तांबे. आता हे चार हात माझ्या मदतीला आहेत. अधिकाधिक भार तेच उचलतात. मला फारसं कष्ट पडू देत नाहीत. आणि मीही ठरवून टाकलंय कि त्यांनी माझ्या मातीत गाळलेल्या घामाचं सोनंच करायच. त्यांच्या नशिबी जरी कष्ट आले असतील तरी त्यांच्या मुलांच्या ओंजळीत शिक्षण भरायच.

काय होईल ते काळच सांगेल. पण हे दोघे माझ्या मदतीला येण्याआधी एक दिवस सकाळी सकाळी मीच माझी छबी टिपली. आणि तेव्हाच हि पोस्ट जन्माला आली

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s