८७वं आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

sahitya snmelan८७वं आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवडला भरलंय. पुण्यापासून अवघ्या २५ किलोमीटरवर. मराठी साहित्यात खूप रुची असूनही स्वतः मोडकं तोडकं लिहित असूनही  मी तिकडं फिरकलोही नाही.

८३वं आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात भरलं होतं. पुण्यात म्हणजे पुण्याच्या अगदी मध्यवर्ती भागात. एसपी कॉलेजच्या मैदानात. प्रख्यात अभिनेते अमिताभ बच्चन हे त्या संमेलनाच प्रमुख आकर्षण. मी संमेलनाला उपस्थित होतो. अमिताभ आले……… बोलले………. गेले………संपलं. त्यानंतर जे काही उरलं त्यापेक्षा आठवडे बाजार बरा.

काय साध्य होतं अशा संमेलनातून ? मराठीची अशी कोणती भरभराट होते ? मुळात मराठीची आज जी असंख्य रूपं आहेत ती स्वतःला साहित्यिक म्हणवून घेणाऱ्या या तथाकथीतांमुळे का ?

खरंतर कोणतीही भाषा जन्माला येते साहित्याचा कोणताही लवलेश नसलेल्या सामान्य माणसामुळे. एकमेकांशी संवाद साधनं हे तिचं प्रयोजन. त्यानंतर ती विस्तारते ……… फोफावते………. वाढते ती इतर भाषांच्या , संस्कृतीच्या संसर्गामुळे. आम्ही साहित्यिक मात्रं मराठी भाषा प्रवाही, जिवंत ठेवण्याचं सारं श्रेयं लाटू पहातोय. खरंतर मराठी साहित्यीकांमुळे मराठी भाषा टिकून राहिली आहे असे नाही तर मराठी भाषेमुळे, ती भाषा बिरुद म्हणून मिरविणाऱ्या सामान्य वाचकांमुळे मराठी साहित्यिक टिकून आहे. तरीही मराठी भाषेच्या संवर्धनाचा टेंभा मिरवत अशी संमेलनं भरताहेत.

खरंतर अशा संमेलनातून मराठी वाचकाच्या मनात मराठी साहित्याविषयी अधिकाधिक ओढ निर्माण व्हायला हवी ………. नव्या दमाच्या लेखकांना बळ मिळायला हवं……….मराठी साहित्य लेखकाचा , रसिकाचा, प्रत्येकाचा श्वास व्हायला हवं. तसं होतंय का ? मुळीच नाही. लेखकाला प्रसिद्धी हवी असते………. व्यासपिठावरचा मान हवा असतो. पुढाऱ्यांच्या मिन्नतवाऱ्या करून एखादा दुसरा पुरस्कार मिळाला कि त्याला कृत्य कृत्य  वाटू लागतं.

समाज बदलण्याची कुवत साहित्यात असते असं म्हणतात. नव्हे स्वातंत्र्यपुर्व काळात, स्वातंत्र्य संग्रामात निर्माण झालेल्या साहित्यानं ते सिद्ध केलंय.  स्वातंत्र्य संग्रामात निर्माण झालेल्या साहित्यानं स्वातंत्र्य संग्रामात आहुती देणाऱ्यांना बळ दिलंय.

पण आजच्या साहित्याची तेवढी कुवत नाही. जुन्या साहित्यात समाज बदलण्याची धमक होती. पण आजचं साहित्य समाजानुसार बदलतंय. आणि त्यालाच वास्तववादी साहित्य अशी उपाधी दिली जातेय. आजच्या साहित्याच्या या मर्यादा सगळ्यांनाच माहित आहेत. म्हणूनच आण्णांच्या आंदोलनाला भरभरून कव्हरेज देणारा मिडिया आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची फारशी दखलही घेत नाही.

स्वतःला मराठी म्हणवून घेणाऱ्या एकाही वृत्तवाहिनीला साहित्य संमेलनाच तीन दिवस थेट प्रक्षेपण करावसं वाटलं नाही. एकाही वृत्तवाहिनीला या संमेलनाच्या परिणामांविषयी चर्चासत्र आयोजित करावसं वाटलं नाही. कारण त्यांना त्यांच्या टिआरपीची चिंता अधिक.   

त्यांनी दखल घेतली ती केवळ संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले, नियोजित अध्यक्ष फ. मु. शिंदे, उद्घाटक शरद पवार यांची. इतर साहित्यिक आणि साहित्य रहातं बाजूला. व्यासपीठावर चर्चा होणाऱ्या साहित्यापेक्षा मिडिया दखल घेतं ती संमेलनाच्या व्यासपीठावरून जेष्ठ पत्रकार कुमार केतकरांनी मोदींवर केलेल्या चिखलफेकीची. गोमुत्र शिंपडावं तशी इतर गोष्टींची थोडी बहुत पखरण केली. 

झालं संपलं साहित्य संमेलन.

आता भेटू पुढल्या वर्षी. नवा गडी नवं राज्य म्हणत. छे छे ! नवा गडी नवं राज्य वगैरे नाही. गडीही तेच राज्यही तेच फक्त रांगोळी वेगळी. 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s