काय साधतात या मालिका ?

संध्याकाळी कुटुंबासोबत अनेकदा वेगवेगळ्या टिव्ही मालिका पहाण्याचा योग येतो. ‘ पुढचं पाऊल ‘ , ‘ देवयानी ‘ , ‘ लक्ष्मी व्हर्सेस सरस्वती ‘ , ‘ स्वप्नांच्या पलीकडले ‘ अशा मराठीतल्या कितीतरी टिव्ही मालिकांची नावं घेता येतील. स्वयंपाक पाणी सातच्या आत उरकून बहुतेक महिला टिव्हीचा रिमोट हाती घेऊन बसलेल्या असतात. महिलांमध्ये चालणाऱ्या भ्रमणध्वनीवरील संभाषणात किंवा फावल्या वेळातील गप्पात बऱ्याचदा या मालीकांवरील चर्चा रंगलेली असते. माझ्या बायकोची पाच वर्षाची भाची केतकी फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटीतील गप्पात वेगवेगळ्या मालिकांवरील रसग्रहणात अगदी तल्लीन होऊन जाते.

ऑफिसातील पुरुषांच्या लंच टेबलवरील गप्पांचा मूडही असाच असतो. पण त्याला झालर असते ती ‘ इंडियन आयडॉल ‘ निवडणाऱ्या विविध नाचगाण्यांच्या, एखाद्याला करोडपती बनविणाऱ्या मालिकांची.

‘ पुढचं पाऊल ‘ , ‘ देवयानी ‘ , ‘ लक्ष्मी व्हर्सेस सरस्वती ‘ , ‘ स्वप्नांच्या पलीकडले ‘ या मालिकांमधली जी काही ओझरती दृश्य आणि कथानकं माझ्या इंद्रियानपर्यंत पोहचली तेव्हा जीव तळमळला. प्रत्येक मालिकेत तेच ते.  कुटुंबातले कलह ( प्रेमाचा त्रिकोण हा विषय आता कालबाह्य झाल्यासारखा वाटतोय ), परस्परात चाललेली कटकारस्थानं, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा चाललेला प्रयत्न एवढंच. बरं या सगळ्या कटकारस्थानात पुढं असतात त्या स्त्रियाच. यात सासू विरुद्ध सून असते……..जावे विरुद्ध जाव असते………भावजयी विरुद्ध नणंद असते ? यातली एक प्रवृत्ती वाईट तर दुसरी प्रवृत्ती चांगली असते.

नेहमी सत्याचाच विजय होतो या न्यायाप्रमाणे चांगल्या प्रवृत्तीचाच विजय होत असावा. होत असावा असं यासाठी म्हणतोय कि सहा सहा महिने वर्ष वर्ष चालणाऱ्या या मालिकेत सुरवात कुठे झालेली असते हेच आठवत नसतं. मग शेवट चांगला कि वाईट हे कोणत्या कसोट्यांवर पाजळून पहाणार. बरं येवढ्या मोठ्या कालावधी या मालिकांमधून इतक्या वाईट व्यक्ती आणि वृत्ती पाहिलेल्या असतात कि चांगलं हाती काही लागण्याची सुतराम शक्यता उरलेली नसते. यातल काय घ्यायचं आजच्या पिढीनं ? काय साधतात या टिव्ही मालिका ? कोणता संस्कार करतात आमच्या नवी स्वप्नं पहाणाऱ्या पिढीवर ? कोण चाप लावणार या साऱ्याला ? कि हे सगळं असंच चालू रहाणार ?

Advertisements

तुम्ही धुतलाय कधी कॉम्पुटर पाण्यानं ?

मला आठवतंय मी सातवी होतो तेव्हाची गोष्ट. वडिलांना त्यांच्या कंपनीत फोन करायचा होता. काही तातडीचा निरोप द्यायचा होता. आईनं मला सांगितलं. तेव्हा मोबाईल सोडाच पण फोनही अगदी पावला पावलावर नव्हते. आमच्या घरापासून जवळ जवळ दहा एक मिनिटं चालावं लागायचं. आमच्य ओळखीच्या एका दुकानदाराकडे फोन. मी तिथ गेलो. फोन लावला. आवाज काही येईना. दुकान्वाल्या काकांना मी अडचण सांगितली.  त्यांनी पाहिलं आणि माझ्या हातातला रिसिव्हर सरळ धरायला सांगितला. म्हणजे मी रिसिव्हर ओठांजवळ आणि माईक कानाजवळ धरला होता. त्या काळी घरातला रेडिओ खराब झाला कि मी खोलायचो आणि जमल तर दुरुस्त नाहीतर बऱ्याचदा कायमचा बाद करून टाकायचो. पण त्या काळीही मी रेडिओ कधी पाण्यानं धुतल्याच मला आठवत नाही.

पण अलिकडे कोण काय करेल आणि कोण काय नाही, काही सांगता येत नाही. पण तरीही कोणतीही स्त्री कपडे धुवून झाल्यानंतर घरातला कॉम्पुटरही पाण्यानं धुवून काढेल ही गोष्ट मनाला पटत नाही. तेही अगदी साबण लावून. माझ्या आजीच्या काळात कॉम्पुटर नव्हता, रेडिओही फार तुरळक होता. माझ्या आजीनं कधी रेडिओ ऐकला असेल तर तो आमच्या घरी पुण्यात आल्यावर. पण ती आमच्या घरीही फार क्वचित आली होती. वयाच्या साठीत. तिच्यानंतर माझ्या चुलत्या आहेत गावी. सगळ्या एकजात अशिक्षित. कॉम्पुटर नसला तरी अलिकडे अगदी ग्रामीण भागातही रेडिओ, टिव्ही, मोबाईल या गोष्टी घराघरात आहेत. पण यातल्या कोणी या गोष्टींना कधी साधं पाणी लागू दिल्याचं माझ्या ऐकिवात नाही.

परवा ‘ पुढचं पाऊल ‘ या सिरीअल मधला एक प्रसंग चुकून माझ्या कानावर पडला. त्या सिरीअलमध्ये असा प्रसंग दाखवलाय.

कल्याणी ही त्यातली नाईका. सोहम हा तिचा नवरा. एक उद्योगपती. घर अगदीच प्रशस्त. तिच्याकडे तिची मैत्रीण येते. आणि ही कल्याणी तिला मोठ्या अभिमानानं सांगते, ” अगं, आज कि नाही मी आमचा कॉम्पुटर अगदी साबण लावून धुतलाय. आज हे खूप खुश होतील.”

तो येतो. त्याला आपल्या बायकोनं कॉम्पुटर साबण लावून पाण्यानं धुतलाय हे कळतं. आणि मग, ” अगं तुला कॉम्पुटर आणि कपडे यातला फरक कळतो का ? ” असा तो तिच्यावर ओरडतो.

पुढं काय होईल हे मला माहिती आहे. तो म्हणेल, ” ही असली अडाणी बायको काय कामाची ? ”

मग तो आणखी कुणाच्या तरी प्रेमात पडेल. झाला त्रिकोण.

कसला हा लेखक आणि डायरेक्टर. या टीम मधल्या कुणालाही हा प्रसंग सिरीयलमधून बाद करावासा वाटला नाही ? आजकाल पहावी आणि घ्यावी अशी एकही सिरीयल टिव्ही नाही. त्यापेक्षा पौराणिक आणि ऐतिहासिक सिरीअल परवडल्या. मला आठवतंय एके काळी ‘ रामायण ‘ आणि ‘ महाभारत ‘ या मालिका पहाताना घराघरातली मंडळी हातातली कामं बाजूला ठेवून टिव्ही समोर बसायची.

आजही बायका ‘ मन उधान वाऱ्याचे ‘ ही मालिका अशीच हातातला काम टाकून पहातात. पण काय आहे त्या मालिकेत हे मला अजून कधीही कळलं नाही.
मराठी चित्रपटांनी कात टाकली पण मराठी सिरीयल मात्र अगदीच भरकटत चालल्या आहेत. हे थांबायला हवं.