‘ आपाची ‘ गाडी…,’ बापाची ‘ गाडी

आपण दिवसेंदिवस जसजसे प्रगत होत चाललो आहोत तसतशी नवी पिढी ध्येयाधिष्टीत होण्याऐवजी अनुकरणप्रिय होत चाललीय.यानं असे कपडे घेतले म्हणून त्याला तसे कपडे हवे असतात, दोन जण पार्टीला निघाले म्हणून त्यांच्या सोबत आणखी चार जण निघाले, एकानं एक गाडी घेतली कि दुसऱ्याला तशीच गाडी हवी असते. पण त्याला एवढे गुण मिळाले तर मला त्यापेक्षा अधिक मिळाले पाहिजेत अशी चढाओढ मात्र दिसत नाही. का असं ? चुकतंय कुठे ? आई वडिलांच्या संस्कारात ? मुळीच नाही. कारण आपली मुलं नीट मार्गाला लागावीत असंच प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं. त्यानुसार ते आपल्या मुलांवर लहानपणापासून संस्कार करण्याचा प्रयत्न करतात. पण तरीही एका विशिष्ठ वयानंतर मुलांना पंख फुटतात. ती स्वतःच भरारी घेऊ पहातात. पण पाखरांच्या पिलांइतकं आपल्या पिलांचं भरारी घेणं सोपं नसतं. कारण भरारी घेणाऱ्या पाखरांच्या पिलांच्या मार्गात निसर्ग असतो आणि आपल्या पिलांच्या मार्गात समाज.

माझा मुलगा बारावी झाला. बारावीला ७७ % गुण. सीइटीला PCM ला १०१ तर PCB ला १०८ गुण. वैद्यकीय शाखेला प्रवेश नाही मिळाला तरी अभियांत्रिकीला मिळण्याची खात्री. प्रवेश प्रक्रिया सुरु झालीय. पण त्याला गेली पंधरा दिवस नव्या गाडीचे वेध लागलेत. नेटवर बाईकचे डिस्प्ले पहाणे, ते मला दाखवणे, कोणत्या मित्रानं कोणती गाडी घेतली याचं रसभरीत वर्णन करणे अशा अनेक गोष्टी सतत सुरु असतात. मला मात्र त्याच्या प्रवेशाची आणि प्रवेश फी ची काळजी.
त्याला हवी आहे अपाची. त्याच्या प्रत्येक सुरातून मला अपाची असं ऐकायला येतंय. शेवटी काळ मी त्याच्यावर चिडलो. म्हणालो, ” तुला आत्ताच ‘ आपाची ‘ गाडी हवीय. ‘ बापाची ‘ गाडी कधी आली होती माहिती आहे का ? “

apache, moter cycle

माझ्या मुलाला हवी असलेली अपाची. १६० सीसीची हि गाडी. माझ्या मुलाच्या चौपट वजनाची. पेट्रोल ओतायला लागतंय पाण्यासारखं.

आणि मी चमकलो. मुलांशी कितीही मैत्रीच्या नात्यानं वागत असलो तरी दोन पिढ्यातलं अंतर समोर आलं. आझे वडीलही मला असाच काहीतरी सांगायचे.

bicycle, सायकल.

सायकल. हीच ती माझ्या बापाची गाडी. वयाच्या चाळीसतही वडील हीच गाडी वापरायचे. वडिलांची स्कूटर आली त्यांच्या वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी. .

मला आठवतंय माझे वडील किती तरी वर्ष सायकल वापरायचे. माझ्या वडिलांनी गाडी घेतली ती साधारणतः मी दहावीला असताना. त्यांच्या वयाच्या चाळीशीत.

हि माझी आयुष्यातली तिसरी गाडी. रिसेल मधून घेतलेली.

हि माझी आयुष्यातली तिसरी गाडी. पहिली गाडी वापरली आठ वर्ष. दुसरी चार वर्ष. आणि तिसरी गाडी वापरतोय. रिसेल मधून घेतलेली. गेल्या सोळा - सतरा वर्षात वापरलेल्या माझ्या तिन्ही गाड्यांची एकूण किंमत ९०००० रुपये. माझ्या मुलाला हव्या असलेल्या पहिल्याच गाडीची किंमत ७०००० रुपये.

माझी गाडी आली होती मी नोकरीला लागल्यानंतर आठ वर्षांनी. तेव्हाचं माझं वय तिशीच.
आणि माझ्या मुलाला कॉलेजात प्रवेश करायचाय तो स्वतःच्या गाडीवरून. त्याचा वय आहे अवघं सतरावं सरलेलं. अजून गाडी चालवायचा परवाना द्यायला आमचं शासन तयार नाही. हे पिढ्यान पिढ्यातलं अंतर पिढ्यान पिढ्या असंच वाढत रहाणार काय ?

Advertisements

तुमचा बाप तुमच्यावर अन्याय करतोय ?

मी लहान होतो तेव्हा माझा बाप माझ्यावर अन्याय करतोय असं मला वाटायचं. त्याचं वागणं चुकीचं नसेल. किंवा मी आज ज्या रीतीनं माझ्या पायावर उभा आहे ते पाहिलं कि वाटतं त्याचं वागणं चुकीचं नव्हताच. पण तरीही मी माझ्या मुलांशी फार कठोरपणे वागू शकत नाही. तरीही माझ्या मुलांना माझं वागणं कठोर वाटत असेल. पण मित्रांनो नाही. प्रत्येक बाप त्याच्या मुलांशी जे काही वागतो ते त्या मुलांच्या उज्ज्वल भावितव्यासाठीच. पण हे आज पटतंय. त्यातूनच ‘ बाबा ‘ ह्या कवितेचा जन्म झाला.

खरंतर तर हि कविता मी माझ्या ब्लॉगवर मागेच पोस्ट केली होती. पुन्हा तीच कविता पोस्ट करतोय म्हणून माझी ‘ नवं लिहिण्याची कुवत संपली कि काय ?’ असा समाज करून घेण्याचं काही कारण नाही. केवळ तेव्हा माझा ब्लॉग मराठी विश्वला जोडलेला नव्हता. म्हणून आज पुन्हा एकदा तीच कविता पोस्ट करतोय.

पुन्हा असं होणार नाही हे निश्चित.

बाबा

मित्रहो गेली काही दिवस माझा मूड बरा आहे. काहीतरी नवं सुचतंय. लिहावसं वाटतंय. भरीस भर म्हणून आजची दुपार निवांत मिळाली. घरातही शांतता होती. मूडही अगदीच प्रसन्न नसला तरी व्याकुळ का असेना पण मूड होता.

पुण्यात संत ज्ञानेश्वारांच्या पालखीच आगमन झालेलं होतं. सकाळी ऑफिसला जातानाच मनात काही भावपूर्ण ओळी आकार घेत होत्या. पण ऑफिसात गेलं कि बऱ्याचदा हे आतल्या आत दाबून टाकावं लागतं.

घरी आल्याबरोबर सकाळी मनात आलेल्या विचारांनीच माझा ताबा घेतला आणि एका दमात ‘ म्हणे विठ्ठल मला….’ हि कविता लिहून झाली.

मागे ‘ बाबादिन ’ किंवा ‘ फादर्स दे ’ या दिवशी मी माझ्या ‘ रे घना ‘ या ब्लॉगसह ‘ अक्कलपुरचे अक्कलराव आणि धमाल ’ या ब्लॉगवरही लेख लिहिला होता. त्या दिवशी –

‘ तुम्ही जेव्हा मान टाकता

तेव्हा बाबा खचत असतो

आधार देता देता तरी

मन मारून हसत असतो.’

या ओळींनी मनात आकार घेतला होता. आज ‘ म्हणे विठ्ठल मला….’ हि कविता पूर्ण झाल्यानंतर लगेच त्या ओळींना समोर घेवून बसलो. खूप खूप आत शिरत गेलो आणि माझी ‘ बाबा ’ हि कविता पूर्ण झाली. आणि आजच्या आज ती ब्लॉगवर टाकतोय.

‘ बाबा ’ आणि ‘ आई ’ हि प्रत्येक मुलाच्या पांगुळगाड्याची दोन चाकं असतात. आपण म्हणजे पुढचं एक चाक. हे पुढचं चाक पुढं जायला हवं असेल तर मागच्या दोन्ही चाकांचा घट्ट आधार हवा.

इथं ‘ आई महान ’ कि ‘ बाबा थोर ’ या वादात मला पडायचं नाही. माझ्या या कवितेतल्या काही ओळी वाचल्यानंतर काही रसिकांना ‘ या गृहस्थाला आईचा मोठेपणा मान्य नसावा ’ असं वाटेल. तसं कुणाला वाटणार असेल तर त्यांनी माझ्या ब्लॉगवरच ‘ आई ’ हे सदर वाचावं.

बाबा

मरण यातना सोसताना

आई जन्म देत असते

आपलं हसू पहात पहात

वेदना विसरून हसत असते.


 

बाबा मात्र हसत हसत

दिवस रात्र खपत असतो

शिस्त लावत आपल्यामधला

हिरवा अंकुर जपत असतो.

 

त्याला कसलंच भान नसत

फक्त कष्ट करत असतो

चिमटा घेत पोटाला

ब्यांकेत पैसा भारत असतो.

 

तुमचा शब्द तो कधी

खाली पडू देत नाही

तुमची हौस भागवताना

पैशाकड पहात नाही

 

तुम्ही म्हणजे त्याची स्वप्नं

तुम्ही म्हणजे त्याचा आभाळ

तुमच्यासाठी गिळत असतो

नामुष्कीची अवघी लाळ.

 

तुम्ही जेव्हा मान टाकता

तेव्हा बाबा खचत असतो

आधार देता देता तरी

मान मारून हसत असतो.

 

तुमच्याकडनं तसं त्याला

खरंच काही नको असतं

तुमचा यश पाहून त्याचं

अवघं पोट भरत असतं.

 

त्याच्या वेदना कुणालाही

कध्धीसुद्धा दिसत नाही

जग म्हणत, “ आई एवढ

बाबा कधी सोसत नाही.”

 

त्याच्या वेदना आपल्याला

तशा कधीच कळणार नाहीत

आज त्याला मागितल्या तर

मुळी सुद्धा मिळणार नाहीत.

 

एक दिवस तुम्हीसुद्धा

कधीतरी बाबा व्हाल

त्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या

स्वप्नांचं आभाळ पहाल

 

तेव्हा म्हणाल, “ आपलं बाबा

खरंच कधी चुकत नव्हता

आपल्यासाठीच आयुष्यभर

रक्तसुद्धा ओकत होता.”

 

तेव्हा सांगतो मित्रांनो

फक्त फक्त एक करा

थरथरणारा हात त्याचा

तुमच्या हातात घट्ट धरा.