आजीबाईंचा बटवा आणि तात्यांची पोतडी

आजीबाईंच्या बटव्याबद्दल आपण प्रत्येकानं ऐकलेलं आहे. नियतीच्या कासोटीला जेवढी दुखणी त्या प्रत्येक दुखण्यावर आजीबाईंच्या बटव्यात औषध सापडत असे असं म्हणतात. पूर्वी आजीबाई कासोटा नेसत. त्याला बटवा असे. आणि त्या बटव्यात औषध. काळाच्या ओघात कासोटा गेला आणि कासोट्यासोबत बटवाही.

आताच्या आजीबाईंना कासोटाच नेसता येत नाही. मग बटवा अडकवणार कुठं ? अहो इतकी दयनीय अवस्था असते आजकालच्या आज्यांची आणि आयांचीही विचारू नका. नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाला अंघोळ घालण्याचं ज्ञानही त्यांना नसतं. मग मोलकरीण लावायची आणि आपल्या कुशीत नऊ महिने जीवापाड जपलेला जीव अंघोळीला तिच्या ताब्यात द्यायचा. आणि घरोघर सांगत फिरायचं, ” माझ्या सोनुला अंघोळ घालायला पारूबाई येते. पाचशे रुपये घेते महिन्याला पण छान अंघोळ घालते हं.” जणू काही ही पारूबाई म्हणजे एक टेक्निशियानच.

असो. मला या सगळ्याबद्दल लिहायचं नाही.

मी शेती करायचा निर्णय घेतला आणि गावी गेलो. एक दिवस दुपारी बैल दारासमोरच सावलीला बांधायचा होता. झाडाचा बुंधा फार मोठा म्हणून त्या बुंध्याला बैल बांधता येत नव्हता. झाडाखाली एखादी खुंटीही नव्हती. आता काय करायचं या चिंतेत मी घरात गेलो. घराचे कानेकोपरे पहिले आणि दीड दीड फुट लांबीचे चार खिळे माझ्या हाती लागले. त्यातलाच एक खिळा झाडाच्या सावलीत ठोकला आणि त्यालाच बैल बांधला.

वडील जरी मागील पाच सहा वर्ष शेती पहात होते तरी ते मजूर लावूनच काम करून घ्यायचे. त्यामुळेच शेतीसाठी आवश्यक सगळीच सनगं त्यांनी घेण्याची काहीच कारणं नव्हती. पण मी स्वतःच शेती करायचं ठरवलं होतं. आणि म्हणूनच गरजेची सारी अवजार माझ्याकडे असणं आवश्यक होतं. पण मला जे जे हवं ते ते सारं मला घरातच मिळू लागलं.

आणि म्हणूनच मला आजीबाईंच्या बटव्याची आठवण झाली. आणि गावाकडच्या आमच्या घराला मला तात्यांची पोतडी असं नाव द्यावंसं वाटलं. कारण मागील चार सहा महिन्यात मला ज्या ज्या गोष्टीची गरज पडली ती प्रत्येक गोष्ट मला आमच्या घरात मिळाली. त्यात फ्युज वायर, नवे कोरे फ्युजचे सेट, स्प्यानरचा अखंड सेट, मोटारीच्या स्टार्टरचे काही सुटे भाग, रबरी प्याकिंग, पाईप, फवारणी पंप, काही कीटक नाशक. साठ एक वर्षापूर्वी बांधलेल्या आमच्या त्या जुन्या घराच्या कानाकोपऱ्यात इतक्या गोष्टी आहेत कि गेल्या पाच सहा महिन्यात मीच ती प्रत्येक गोष्ट हाताळून पहिली नाही. ज्या गोष्टीची गरज भासेल तिचा शोध घ्यावा आणि ती सापडावी असंच चाललं आहे.

आताच्या कडकडत्या उन्हाळ्यात कमी पडणाऱ्या पाण्याची जाणीव जणू त्यांना आधीच झाली होती म्हणूनच त्यांनी एक बोअर घेतलं होतं. आज त्या बोअरच्या जीवावरच या उन्हाळ्यात मी लागवड केलेल्या सगळ्या पिकानं तग धरली.  त्यात साडे पाच एकर उस आहे. दीड एकर भुईमुग आहे. एकरभर भेंडी आहे आणि आमच्या बैलासाठी घासही आहे. आणि आता त्या बोअरच्या जीवावरच माझं उर्वरित सहा एकर क्षेत्र पाण्याखाली आणण्याचं स्वप्नं पहातो आहे.

वडिलांच्या आशीर्वादासारखी ही पोतडी. मी जो पर्यंत शेती करीन तो पर्यंत मला काही कमी पडू देणार नाही असं मला विश्वास आहे.

तात्यांची पोतडी

तात्यांची पोतडी

Advertisements

होय ! अखेर जिंकलोत….

नुकत्याच लिहिलेल्या एक दोन पोस्टमध्ये मी मागच्या दोनतीन महिन्यात का लिहू शकलो नाही याची कारणं सांगतली होती. वारंवार गावी शेतावर जावं लागायचं. तिथ कुठली नेट आणि कुठला ब्लॉग. शेतातली कामं करणं……बैलाचं पाहणं…….आणि त्यानंतर माझी मीच भाजीपोळी करून पोट भरणं असं सारं काही चाललं होतं. शेतीसाठी हवं असणारं कुटुंब मला अजूनतरी मिळालं नाही. आणि कुठल्याही परिस्थितीत आपण हार मानायची नाही असं ठरवलेलं असल्यामुळे मी पडेल ते कष्ट झेलतो आहे.

त्यातूनही पंधरा वीस दिवसासाठी पुण्यात यायचो. पण पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत माझ्या बहिणीला नगरसेवक या पदासाठी शिवसेनेची उमेदवारी मिळाली होती. आणि मी त्या प्रचार मोहिमेत अडकून पडलो होतो.

उमेदवारी मिळणारच होती. प्रश्न होता विजयाचा. कारण एकदा माझे बंधू श्री. संजय शेंडगे १८ मतांनी पराभूत झाले होते. तर मागच्या निवडणुकीत माझी बहिण आशा शेंडगे ( हे माहेरचं नाव. याच नावानं तिनं निवडणूक लढवलीय ) केवळ ४९ मतांनी पराभूत झाली होती. सहाजिकच निवडणुकीला समोर जाण्याची आणि निवडणून येण्याची आपली पात्रता नाही असं मला मुळीच वाटत नव्हतं. खरतरं आम्ही कधीच पराभूत व्हायला नको होतो. कारण माझे बंधू श्री. संजय शेंडगे हे ज्ञानराज माध्यमिक विद्या प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेचे संस्थापक. १९९५ साली त्यांनी स्थापन केलेली हि संस्था. याच संस्थेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या ज्ञानराज माध्यमिक विद्यालयात आज एक हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेताहेत. त्यांचे पालक हीच आमची पुंजी. याबरोबरच इतरही अनेक समाजपयोगी कामा माझ्या बंधूंनी केली होती. दिन दुबळ्यांची अडल्या नडलेल्यांची पाठराखण केली होती. त्यामुळे विजयाची खात्री नेहमीच असायची. पक्षालाही याची जाणीव होती. पण दोन्ही वेळेस पराभव पदरात पडला होता. कुठंतरी चुकतही होतं.

                   पण दोन्ही वेळच्या थोडक्यात झालेल्या पराभवानं पक्षालाही आमच्या विजयाची खूप अपेक्षा होती. म्हणूनच यावेळी जिथं अनेकांना शेवटच्या क्षणापर्यंत पक्षाचं तिकीट मिळत नव्हतं तिथं आमच्या पक्षानं मात्र फॉर्म भरल्याबरोबर आमच्या ओंजळीत तिकीट टाकलं होतं. त्यासाठी पक्षाचे भारतीय विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्राचे उपप्रमुख श्री.सारंग कामठेकर, शिवसेनेचे पिंपरी चिंचवड शहरप्रमुख भगवान आप्पा वाल्हेकर, विभागप्रमुख श्री हाजीभाई, माननीय खासदार श्री. गजानन बाबरसाहेब, माननीय खासदार श्री शिवाजीराव आढळराव पाटील अशा अनेकांनी आम्हाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आमची पाठराखण केली होती. या साऱ्यांना विश्वास होतं तो एवढाच कि दोन वेळा थोड्या मतांनी पराभूत झालेलेला हा वाघ यावेळीतरी विजयश्री खेचून आणेल.

shivsena

shivsena

त्यामुळेच या वेळी काही झालं तरी विजयाला गवसणी घालायचीच असा निर्धार केलेला. माझा छोटा मुलगा दहावीला. त्याची परीक्षा तोंडावर आलेली. त्याला दहा टक्के कमी मिळाले तरी हरकत नाही. पण यावेळी पराभवाचं तोंड पहायचं नाही असा निर्धार केलेला. मी, माझी पत्नी, माझे बंधू , माझ्या दोन्ही भावजया,  बहिणीचे पती असे सारे एकजुटीने कामाला लागलोत. अधिक नियोजनबद्ध काम केलं. पण विरोधी उमेदवार पन्नास लाखाहून अधिक खर्च करीत होते आणि आमच्या खिशात दोनचार लाखही नव्हते. मागच्या दोन्ही पराभवाला मनुष्यबळाची कमतरता हे जसं एक कारण होतं, तसंच आर्थिक चणचण हेही प्रमुख कारण होतं. सारी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. सहाजिकच विरोधी उमेदवारांकडून मतांसाठी वाटला जात असलेला पैसा पाहून आम्ही हबकून गेलो.

sanjay shendge

asha shendge, sanjay shendge

यावेळीही विरोधकांचा पैसा आपल्याला धूळ चारणार असं वाटू लागलं.
पण नाही…………..अशोक गडे, लक्षुमन जगताप, त्रिंबके परिवार, ऑड. पडवळे मामा, किरण आणि विशाल हे शिंदे बंधू , विनायक मोहिते, अमोल महांकाले, ऑड अमित चौकडे, सौ. गुरव, सौ सिंग अशा स्थानिक पातळीवरील अनेक कार्यकर्त्यांनी झटून काम केलं.

पैशाचा माज चढलेले आजकालचे उमेदवार दिन-दुबळ्या, गरीब,झोपडपट्टीतल्या मतदारांना हजार दोनहजार रुपयात खरेदी करू पहातात. पैसे नको म्हणण्याच आणि हव्या त्या माणसाला मत देण्याचं धाडसही त्यांच्यात नसतं. पण त्यातूनही या मतदारांनी त्यांच्यापरीनं आमची पाठराखण केली. मुस्लीम मतदार आणि शिवसेना यांच्यात जातीचं राजकारण नको म्हणणाऱ्या शक्तींनीच बिब्बा घातलाय. त्यामुळेच मुस्लीम मतदार शिवसेना सोडून इतर पक्षांच्या मागे जातात. पण यावेळी कासारवाडीतील मुस्लीम मतदारांनीही आमची पाठराखण केली.

shivsen,

shivsen,

आणि शेवटी सत्याचा विजय झाला……..मतदारांनी मनासारखा कौल दिला आणि मागच्या वेळी ४९ मतांनी पराभूत झालेली माझी बहिण आशा सुखदेव शेंडगे ही थोड्या थीड्क्या नव्हे तर चक्क १२१२ मतांनी विजयी झाली आहे. या सगळ्या आनंदात एक दुःख उरी सलत होतं. दोन्ही वेळा आमचा पराभव पहावा लागलेले आमचे वडील हा विजय पहायला मात्र आमच्यात नव्हते. पण त्यांनीही स्वर्गातून आमची पाठराखण केलेली असावी म्हणुनच हा विजय आमच्या पदरी पडला असावा.  

आता जबाबदारी वाढली आहे.

‘ आपाची ‘ गाडी…,’ बापाची ‘ गाडी

आपण दिवसेंदिवस जसजसे प्रगत होत चाललो आहोत तसतशी नवी पिढी ध्येयाधिष्टीत होण्याऐवजी अनुकरणप्रिय होत चाललीय.यानं असे कपडे घेतले म्हणून त्याला तसे कपडे हवे असतात, दोन जण पार्टीला निघाले म्हणून त्यांच्या सोबत आणखी चार जण निघाले, एकानं एक गाडी घेतली कि दुसऱ्याला तशीच गाडी हवी असते. पण त्याला एवढे गुण मिळाले तर मला त्यापेक्षा अधिक मिळाले पाहिजेत अशी चढाओढ मात्र दिसत नाही. का असं ? चुकतंय कुठे ? आई वडिलांच्या संस्कारात ? मुळीच नाही. कारण आपली मुलं नीट मार्गाला लागावीत असंच प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं. त्यानुसार ते आपल्या मुलांवर लहानपणापासून संस्कार करण्याचा प्रयत्न करतात. पण तरीही एका विशिष्ठ वयानंतर मुलांना पंख फुटतात. ती स्वतःच भरारी घेऊ पहातात. पण पाखरांच्या पिलांइतकं आपल्या पिलांचं भरारी घेणं सोपं नसतं. कारण भरारी घेणाऱ्या पाखरांच्या पिलांच्या मार्गात निसर्ग असतो आणि आपल्या पिलांच्या मार्गात समाज.

माझा मुलगा बारावी झाला. बारावीला ७७ % गुण. सीइटीला PCM ला १०१ तर PCB ला १०८ गुण. वैद्यकीय शाखेला प्रवेश नाही मिळाला तरी अभियांत्रिकीला मिळण्याची खात्री. प्रवेश प्रक्रिया सुरु झालीय. पण त्याला गेली पंधरा दिवस नव्या गाडीचे वेध लागलेत. नेटवर बाईकचे डिस्प्ले पहाणे, ते मला दाखवणे, कोणत्या मित्रानं कोणती गाडी घेतली याचं रसभरीत वर्णन करणे अशा अनेक गोष्टी सतत सुरु असतात. मला मात्र त्याच्या प्रवेशाची आणि प्रवेश फी ची काळजी.
त्याला हवी आहे अपाची. त्याच्या प्रत्येक सुरातून मला अपाची असं ऐकायला येतंय. शेवटी काळ मी त्याच्यावर चिडलो. म्हणालो, ” तुला आत्ताच ‘ आपाची ‘ गाडी हवीय. ‘ बापाची ‘ गाडी कधी आली होती माहिती आहे का ? “

apache, moter cycle

माझ्या मुलाला हवी असलेली अपाची. १६० सीसीची हि गाडी. माझ्या मुलाच्या चौपट वजनाची. पेट्रोल ओतायला लागतंय पाण्यासारखं.

आणि मी चमकलो. मुलांशी कितीही मैत्रीच्या नात्यानं वागत असलो तरी दोन पिढ्यातलं अंतर समोर आलं. आझे वडीलही मला असाच काहीतरी सांगायचे.

bicycle, सायकल.

सायकल. हीच ती माझ्या बापाची गाडी. वयाच्या चाळीसतही वडील हीच गाडी वापरायचे. वडिलांची स्कूटर आली त्यांच्या वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी. .

मला आठवतंय माझे वडील किती तरी वर्ष सायकल वापरायचे. माझ्या वडिलांनी गाडी घेतली ती साधारणतः मी दहावीला असताना. त्यांच्या वयाच्या चाळीशीत.

हि माझी आयुष्यातली तिसरी गाडी. रिसेल मधून घेतलेली.

हि माझी आयुष्यातली तिसरी गाडी. पहिली गाडी वापरली आठ वर्ष. दुसरी चार वर्ष. आणि तिसरी गाडी वापरतोय. रिसेल मधून घेतलेली. गेल्या सोळा - सतरा वर्षात वापरलेल्या माझ्या तिन्ही गाड्यांची एकूण किंमत ९०००० रुपये. माझ्या मुलाला हव्या असलेल्या पहिल्याच गाडीची किंमत ७०००० रुपये.

माझी गाडी आली होती मी नोकरीला लागल्यानंतर आठ वर्षांनी. तेव्हाचं माझं वय तिशीच.
आणि माझ्या मुलाला कॉलेजात प्रवेश करायचाय तो स्वतःच्या गाडीवरून. त्याचा वय आहे अवघं सतरावं सरलेलं. अजून गाडी चालवायचा परवाना द्यायला आमचं शासन तयार नाही. हे पिढ्यान पिढ्यातलं अंतर पिढ्यान पिढ्या असंच वाढत रहाणार काय ?

बाबा काठी टाकून द्या

[ या महिन्यात १९ तारखेला बाबादिन ( father ‘s day ) आहे. तेव्हा हि पोस्ट वाचायची टाळू नका. मला माहिती आहे तुम्ही खूप चांगलं वागत असाल आपल्या आई बाबांशी. पण कुणाचं चुकत असेल तर काय करा हे मी सांगायला हवं का ? ]

काही दिवसांपूर्वीची घटना आहे. मी शिवाजीनगरहून कात्रजला निघालो होतो. लाल महालाजवळील चौकात सिग्नलला थांबलो होतो. एक सत्तरीचे गृहस्थ माझ्या जवळ आले आणि मला म्हणाले, ” बाळ , मला चौकात चुकत सोडशील का ? ” मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.

बाबांचं वय सत्तरीच. अंगात जुने मळकट कपडे. त्यावर कोट. पायात जुनाट वहाणा. डोक्यावर शेठी टोपी. सिग्नल सुरु झाला. मी बाबांना घेऊन निघालो. सिग्नलमागून सिग्नल जात राहिले. मी बाबांशी थोड्या-बहुत गप्पा मारल्या. बाबा इंग्रजीचे उत्तम व्यासंगी. माझ्यासारख्या पोस्ट ग्र्याजुएत तरुणाला लाज वाटावी असं इंग्लिश बोलत होते. मला त्यांच्याविषयी आदर वाटला. ‘ त्यांचं ठिकाण आलं कि बाबा सांगतीलच.’ म्हणून मी गाडी चालवत राहिलो. चौकामागून चौक गेले. पण बाबा काही कुठं उतरायचं ते सांगेनात. स्वारगेटच्या सिग्नलला गाडी थांबली. तेव्हा मीच म्हणालो, ” बाबा, तुम्हाला कुठ जायचं ?”

” तू कुठवर जाणार आहेस बाळ ? “

” बाबा, मला कात्रजला जायचं. “

” मग असं कर. मला इथच सोड. मला डाव्या बाजूला जायचं. “

“मी सोडू का तुम्हाला तुमच्या घरापर्यंत ? “

” नको बाळ. जवळच आलंय माझं घर. जाईन मी चालत. थ्यन्क्स. ” म्हणत बाबा उतरले. डाव्या बाजूच्या गर्दीत दिसेनासे झाले.

सिग्नल सुटला म्हणून मीही निघालो. पण डोक्यात प्रश्नाचं मोहळ उठलं होतं.
ज्या बाबांना पुढच्या चौकात उतरायचं होतं ते बाबा इथवर का आले ? मुला असतील न त्यांना ? मग त्यांनी पैसे दिले नसतील का ? कि मुलं पहातच नसतील बाबांना ?

मी मागे पुण्यातल्या निवारा या वृद्धाश्रमात मी माझ्या कवितांचा कार्यक्रम सदर केला होता. त्यात आपल्याला कविता सदर करायची संधी मिळावी यापेक्षा मुलांविना खऱ्या अर्थानं पोरक्या झालेल्या आई बाबांच्या आयुष्यात आनंदाचे चार क्षण आणावेत एवढाच हेतू होता. सगळेच अगदी मंत्रमुग्ध होऊन कार्यक्रम ऐकत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक समाधान आणि कौतुक दिसत होतं. काही स्त्रियांनी माझी आया – माया घेऊन  कडकडून बोटं मोडली. सगळ्यांसोबत काही वेळ गप्पा मारल्या. तेव्हा कळलं इथ यायची कुणालाच हौस नव्हती.

पण………….

कुणाची मुलं अमेरिकेला होती…………
कुणाच्या मुलांना आई बाबांकडे पहायला वेळ नव्हता………..
कुणी त्यांच्या आजारपणाला कंटाळल होतं……….
कुणाला पैसे गेले तरी चालतील पण हि अडगळ घरात नको होती………..
पण असं असूनही कुणाच्याही बोलण्यात आपल्या मुलांविषयी कटुता नाही जाणवली.

का होतं असं ? आई बाबांना आपली जाणीव असते. त्यांची माया असते आपल्यावर. मग आपल्याच मायेला ओहोटी का लागते ? त्यांनी भरवलेल्या चिऊकाऊच्या घासाचा विसर कसा पडतो आपल्याला ? कसे विसरतो आपण त्यांनी आधाराला दिलेलं बोट ? आपल्या आई बाबांनी आपल्यासाठी काय काय केलंय याचा विसर कसा पडतो आपल्याला ?

बरयाच घरात सासू सुनेचं पटत नाही हि वस्तुस्थिती असते.  का ?

सून असो कि मुलगा जेव्हा जेव्हा तुम्हाला घरातल्या वठलेल्या वृक्षावर चिडण्याची रागवण्याची वेळ येईल तेव्हा तेव्हा त्यांनी आपल्या लहानपणी किती कष्ट खाल्ल्यात याचं स्मरण करावं.

त्यांनी जे केलं त्याला आपण ‘ कर्तव्य ‘ असं नाव देणार असुत तर मग आपल्याला आपल्या कर्तव्याचा विसर का पडावा ?

यापेक्षा अधिक काय सांगू !!!!!!

बाबा, father

बाबा, father

मृत्युपूर्वी मरण दिसतंच !!!!!

मेल्यानंतर स्वर्ग दिसतो कि नाही माहित नाही. जिवंतपणी ते आपल्याला कळत नाही. वैकुंठवासी झालेल्यांना ते कळतही असेल. पण त्यांचा अनुभव ते पुन्हा आपल्यात येवून कथन करू शकत नाहीत.

मेल्यानंतर स्वर्ग दिसत असो अथवा नसो पण मृत्युपूर्वी मरणाची चाहूल लागते हे नक्की.

३१ ऑगष्टला माझ्या वडिलांना देवाज्ञा झाली. वय वर्ष ६७. अंगकाठी मजबूत. सगळे दात शाबूत. चष्मा सुद्धा नाही. कधी कुठला आजार नाही. पुण्यापासून १२० किलोमीटर लांब असणारी आमची शेती. तिथ जावून एकट्यानं पहायचे. जाताना येतानाचा प्रवास दुचाकीवर. सहाजिकच ते असे अचानक आम्हाला सोडून जातील अशी शंकासुद्धा कधी मनात आली नव्हती.

माझं वय चाळीशीच. वडील आजतागायत त्यांच्या प्रापर्टीविषयी चकार शब्दानं माझ्याशी कधी काही बोलले नाहीत. पण १५ ऑगष्टला त्यांच्या माझ्यात शेवटचं संभाषण झालेलं. पाठचा भाऊही तिथच होता. आपल्या मोठ्या मुलाशी आपलं हे शेवटचं संभाषण, याची त्यांना जाणीव झाली होती कि काय कुणास ठावूक. पण कधी नव्हे ते मला म्हणाले, ” हे बघ विजय, माझ्या प्रापर्टीची मी तुम्हा तिघा भावांमध्ये अशी अशी वाटणी करायची ठरवली आहे. काही तक्रार असेल तर आत्ताच सांगा.”

” एवढ्यात हा सगळा विचार करायची काही गरज आहे का ?”

” तसं नाही रे हे सारं मी गेल्या चार वर्षापूर्वीच ठरवलंय. तुम्हाला कधी तरी सांगायलाच हवं ना ! ”

झालं. हेच माझं वडिलांशी झालेलं शेवटचं संभाषण. आपली इहलोकीची यात्रा संपत आल्याचं कळल्यासारखं ते माझ्याशी बोलून गेले.

वडील गेल्यानंतरच्या दहा दिवसात दहा तोंडांनी खूप काही ऐकायला मिळालं. त्यातून काढलेलं हे अनुमान –

मेल्यानंतर स्वर्ग दिसतो कि नाही माहित पण मरणापूर्वी मृत्यू नक्कीच दिसत असावा.

शेवटच्या आठ पंधरा दिवसात वडिलांनी त्यांच्या सगळ्या मित्रांच्या अगदी आवर्जून भेटी घेतल्या.

कॅरम हा त्यांचा आवडता खेळ. असं असूनही मागील आठ दहा वर्षात त्यांनी कॅरमला स्पर्शही केला नव्हता. पण त्यांची प्राणज्योत मालवली मंगळ्वारी. त्या आधी दोन दिवस म्हणजे रविवारी ते कॅरम हाउस मध्ये गेले. तिथं त्यांना नेमका त्यांचा एक खूप जुना आणि जवळचा मित्र सवंगडी म्हणून लाभला. त्याच्याशी गेम खेळले…………..जिंकले सुद्धा.

त्यांचा मित्र म्हणाला, ” तात्या चला, आणखी एक गेम खेळू.”

त्यावर वडील म्हणाले, ” नाही, हा अखेरचा गेम.”

ते कुठल्या अर्थानं म्हणाले ते माहित नाही. पण मला वाटलं ते एवढच………..त्यांना त्यांचा मृत्यू दिसला असावा.

आणखी एक प्रसंग सांगितला तर तुम्हाला नक्की पटेल माझं म्हणणं.

वडिलांची प्राणज्योत मालवली. अंत्यविधी कुठे करायचा अशी विचारणा माझ्या पाठच्या बंधूंनी केली.

” इथच करू या.” मी.

” नाही भाऊ. त्यांचं सगळं लहानपण गावी गेलं, त्या मातीत ते लहानाचे मोठे झाले. त्याच मातीच्या कुशीत देह ठेवावा असंच त्यांना वाटत असणार.”

” हे बघ संजय, तुझा म्हणणं योग्य आहे. गावी त्यांचा जमीन – जुमला आहे, शेतीवाडी आहे हे मान्य. पण गावाहून अंगावरच्या कपड्यानिशी येऊन इथंही त्यांनी त्यांचं जग उभं केलंय. यातही त्यांचा जीव गुंतला असेल.”

” नाही भाऊ, मला नाही पटत हे. ”

फार मंथन करण्याची ते वेळी नव्हती आणि तशी माझी मनस्थितीही नव्हती. सहाजिकच, ” तुला योग्य वाटेल तसं कर असं म्हणून मी मोकळा झालो.”

त्याला योग्य वाटणाराच निर्णय त्यानं घेतला असता. पण ………

पुढच्या दहा एक मिनिटात भावाचा मोबाईल वाजला. पलीकडे माझा चुलतभाऊ होता. तो म्हणाला, ” तात्यांचा अंत्यविधी कुठं करायचा ते तुम्ही ठरवा. पण आठ दहा दिवसापूर्वी तात्या माझ्याकडं आले होते तेव्हा मला म्हणाले होते कि, बबन उद्या जर माझं काही बरं वाईट झालं तर पोरांना सांग माझे सगळे अंतिम विधी इथं पुण्यातच करा. गावी नको.”

बस्स !!!

हि घटना त्यांच्या मृत्युच्या आठ दिवस आधीची.

आता तरी पटतंय ना मी काय म्हणतोय ते ?

मेल्यानंतर माणसाला स्वर्ग दिसो अथवा न दिसो पण मृत्यूआधी माणसाला त्याच्या मरणाची चाहूल नक्कीच लागत असावी. फक्त, ” माझं मरण आठ दिवसांवर आलाय किंवा मी आठ दिवसांनी तुम्हा साऱ्यांना सोडून जाणार आहे. ” एवढ्या स्पष्ट शब्दात आपलं मरण व्यक्त करण्याची कुवत परमेश्वरानं आपल्याला दिली नसावी.

तुमचा बाप तुमच्यावर अन्याय करतोय ?

मी लहान होतो तेव्हा माझा बाप माझ्यावर अन्याय करतोय असं मला वाटायचं. त्याचं वागणं चुकीचं नसेल. किंवा मी आज ज्या रीतीनं माझ्या पायावर उभा आहे ते पाहिलं कि वाटतं त्याचं वागणं चुकीचं नव्हताच. पण तरीही मी माझ्या मुलांशी फार कठोरपणे वागू शकत नाही. तरीही माझ्या मुलांना माझं वागणं कठोर वाटत असेल. पण मित्रांनो नाही. प्रत्येक बाप त्याच्या मुलांशी जे काही वागतो ते त्या मुलांच्या उज्ज्वल भावितव्यासाठीच. पण हे आज पटतंय. त्यातूनच ‘ बाबा ‘ ह्या कवितेचा जन्म झाला.

खरंतर तर हि कविता मी माझ्या ब्लॉगवर मागेच पोस्ट केली होती. पुन्हा तीच कविता पोस्ट करतोय म्हणून माझी ‘ नवं लिहिण्याची कुवत संपली कि काय ?’ असा समाज करून घेण्याचं काही कारण नाही. केवळ तेव्हा माझा ब्लॉग मराठी विश्वला जोडलेला नव्हता. म्हणून आज पुन्हा एकदा तीच कविता पोस्ट करतोय.

पुन्हा असं होणार नाही हे निश्चित.

बाबा

मित्रहो गेली काही दिवस माझा मूड बरा आहे. काहीतरी नवं सुचतंय. लिहावसं वाटतंय. भरीस भर म्हणून आजची दुपार निवांत मिळाली. घरातही शांतता होती. मूडही अगदीच प्रसन्न नसला तरी व्याकुळ का असेना पण मूड होता.

पुण्यात संत ज्ञानेश्वारांच्या पालखीच आगमन झालेलं होतं. सकाळी ऑफिसला जातानाच मनात काही भावपूर्ण ओळी आकार घेत होत्या. पण ऑफिसात गेलं कि बऱ्याचदा हे आतल्या आत दाबून टाकावं लागतं.

घरी आल्याबरोबर सकाळी मनात आलेल्या विचारांनीच माझा ताबा घेतला आणि एका दमात ‘ म्हणे विठ्ठल मला….’ हि कविता लिहून झाली.

मागे ‘ बाबादिन ’ किंवा ‘ फादर्स दे ’ या दिवशी मी माझ्या ‘ रे घना ‘ या ब्लॉगसह ‘ अक्कलपुरचे अक्कलराव आणि धमाल ’ या ब्लॉगवरही लेख लिहिला होता. त्या दिवशी –

‘ तुम्ही जेव्हा मान टाकता

तेव्हा बाबा खचत असतो

आधार देता देता तरी

मन मारून हसत असतो.’

या ओळींनी मनात आकार घेतला होता. आज ‘ म्हणे विठ्ठल मला….’ हि कविता पूर्ण झाल्यानंतर लगेच त्या ओळींना समोर घेवून बसलो. खूप खूप आत शिरत गेलो आणि माझी ‘ बाबा ’ हि कविता पूर्ण झाली. आणि आजच्या आज ती ब्लॉगवर टाकतोय.

‘ बाबा ’ आणि ‘ आई ’ हि प्रत्येक मुलाच्या पांगुळगाड्याची दोन चाकं असतात. आपण म्हणजे पुढचं एक चाक. हे पुढचं चाक पुढं जायला हवं असेल तर मागच्या दोन्ही चाकांचा घट्ट आधार हवा.

इथं ‘ आई महान ’ कि ‘ बाबा थोर ’ या वादात मला पडायचं नाही. माझ्या या कवितेतल्या काही ओळी वाचल्यानंतर काही रसिकांना ‘ या गृहस्थाला आईचा मोठेपणा मान्य नसावा ’ असं वाटेल. तसं कुणाला वाटणार असेल तर त्यांनी माझ्या ब्लॉगवरच ‘ आई ’ हे सदर वाचावं.

बाबा

मरण यातना सोसताना

आई जन्म देत असते

आपलं हसू पहात पहात

वेदना विसरून हसत असते.


 

बाबा मात्र हसत हसत

दिवस रात्र खपत असतो

शिस्त लावत आपल्यामधला

हिरवा अंकुर जपत असतो.

 

त्याला कसलंच भान नसत

फक्त कष्ट करत असतो

चिमटा घेत पोटाला

ब्यांकेत पैसा भारत असतो.

 

तुमचा शब्द तो कधी

खाली पडू देत नाही

तुमची हौस भागवताना

पैशाकड पहात नाही

 

तुम्ही म्हणजे त्याची स्वप्नं

तुम्ही म्हणजे त्याचा आभाळ

तुमच्यासाठी गिळत असतो

नामुष्कीची अवघी लाळ.

 

तुम्ही जेव्हा मान टाकता

तेव्हा बाबा खचत असतो

आधार देता देता तरी

मान मारून हसत असतो.

 

तुमच्याकडनं तसं त्याला

खरंच काही नको असतं

तुमचा यश पाहून त्याचं

अवघं पोट भरत असतं.

 

त्याच्या वेदना कुणालाही

कध्धीसुद्धा दिसत नाही

जग म्हणत, “ आई एवढ

बाबा कधी सोसत नाही.”

 

त्याच्या वेदना आपल्याला

तशा कधीच कळणार नाहीत

आज त्याला मागितल्या तर

मुळी सुद्धा मिळणार नाहीत.

 

एक दिवस तुम्हीसुद्धा

कधीतरी बाबा व्हाल

त्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या

स्वप्नांचं आभाळ पहाल

 

तेव्हा म्हणाल, “ आपलं बाबा

खरंच कधी चुकत नव्हता

आपल्यासाठीच आयुष्यभर

रक्तसुद्धा ओकत होता.”

 

तेव्हा सांगतो मित्रांनो

फक्त फक्त एक करा

थरथरणारा हात त्याचा

तुमच्या हातात घट्ट धरा.