तुमचा बाप तुमच्यावर अन्याय करतोय ?

मी लहान होतो तेव्हा माझा बाप माझ्यावर अन्याय करतोय असं मला वाटायचं. त्याचं वागणं चुकीचं नसेल. किंवा मी आज ज्या रीतीनं माझ्या पायावर उभा आहे ते पाहिलं कि वाटतं त्याचं वागणं चुकीचं नव्हताच. पण तरीही मी माझ्या मुलांशी फार कठोरपणे वागू शकत नाही. तरीही माझ्या मुलांना माझं वागणं कठोर वाटत असेल. पण मित्रांनो नाही. प्रत्येक बाप त्याच्या मुलांशी जे काही वागतो ते त्या मुलांच्या उज्ज्वल भावितव्यासाठीच. पण हे आज पटतंय.

त्या वयात कळतच नाही चुकतंय कोण ते. कळत नाही म्हणण्यापेक्षा आपण बरोबरच आहोत. कळत नाही ते आपल्या आई बाबांना. आपल्या वयात तेही असेच वागले असतील. आपल्यासारख्याच चुका केल्या असतील. आपण जसा आज मार खातो ना त्यांचा तसा त्यांनीही मार खाल्ला असेल आपल्या आजोबांचा. पण आज आपल्याला शहाणपण शिकवताहेत. असं ठाम मत असतं आपलं.

पण Continue reading

Advertisements

आजीबाईंचा बटवा आणि तात्यांची पोतडी

आजीबाईंच्या बटव्याबद्दल आपण प्रत्येकानं ऐकलेलं आहे. नियतीच्या कासोटीला जेवढी दुखणी त्या प्रत्येक दुखण्यावर आजीबाईंच्या बटव्यात औषध सापडत असे असं म्हणतात. पूर्वी आजीबाई कासोटा नेसत. त्याला बटवा असे. आणि त्या बटव्यात औषध. काळाच्या ओघात कासोटा गेला आणि कासोट्यासोबत बटवाही.

आताच्या आजीबाईंना कासोटाच नेसता येत नाही. मग बटवा अडकवणार कुठं ? अहो इतकी दयनीय अवस्था असते आजकालच्या आज्यांची आणि आयांचीही विचारू नका. नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाला अंघोळ घालण्याचं ज्ञानही त्यांना नसतं. मग मोलकरीण लावायची आणि आपल्या कुशीत नऊ महिने जीवापाड जपलेला जीव अंघोळीला तिच्या ताब्यात द्यायचा. आणि घरोघर सांगत फिरायचं, ” माझ्या सोनुला अंघोळ घालायला पारूबाई येते. पाचशे रुपये घेते महिन्याला पण छान अंघोळ घालते हं.” जणू काही ही पारूबाई म्हणजे एक टेक्निशियानच.

असो. मला या सगळ्याबद्दल लिहायचं नाही.

मी शेती करायचा निर्णय घेतला आणि गावी गेलो. एक दिवस दुपारी बैल दारासमोरच सावलीला बांधायचा होता. झाडाचा बुंधा फार मोठा म्हणून त्या बुंध्याला बैल बांधता येत नव्हता. झाडाखाली एखादी खुंटीही नव्हती. आता काय करायचं या चिंतेत मी घरात गेलो. घराचे कानेकोपरे पहिले आणि दीड दीड फुट लांबीचे चार खिळे माझ्या हाती लागले. त्यातलाच एक खिळा झाडाच्या सावलीत ठोकला आणि त्यालाच बैल बांधला.

वडील जरी मागील पाच सहा वर्ष शेती पहात होते तरी ते मजूर लावूनच काम करून घ्यायचे. त्यामुळेच शेतीसाठी आवश्यक सगळीच सनगं त्यांनी घेण्याची काहीच कारणं नव्हती. पण मी स्वतःच शेती करायचं ठरवलं होतं. आणि म्हणूनच गरजेची सारी अवजार माझ्याकडे असणं आवश्यक होतं. पण मला जे जे हवं ते ते सारं मला घरातच मिळू लागलं.

आणि म्हणूनच मला आजीबाईंच्या बटव्याची आठवण झाली. आणि गावाकडच्या आमच्या घराला मला तात्यांची पोतडी असं नाव द्यावंसं वाटलं. कारण मागील चार सहा महिन्यात मला ज्या ज्या गोष्टीची गरज पडली ती प्रत्येक गोष्ट मला आमच्या घरात मिळाली. त्यात फ्युज वायर, नवे कोरे फ्युजचे सेट, स्प्यानरचा अखंड सेट, मोटारीच्या स्टार्टरचे काही सुटे भाग, रबरी प्याकिंग, पाईप, फवारणी पंप, काही कीटक नाशक. साठ एक वर्षापूर्वी बांधलेल्या आमच्या त्या जुन्या घराच्या कानाकोपऱ्यात इतक्या गोष्टी आहेत कि गेल्या पाच सहा महिन्यात मीच ती प्रत्येक गोष्ट हाताळून पहिली नाही. ज्या गोष्टीची गरज भासेल तिचा शोध घ्यावा आणि ती सापडावी असंच चाललं आहे.

आताच्या कडकडत्या उन्हाळ्यात कमी पडणाऱ्या पाण्याची जाणीव जणू त्यांना आधीच झाली होती म्हणूनच त्यांनी एक बोअर घेतलं होतं. आज त्या बोअरच्या जीवावरच या उन्हाळ्यात मी लागवड केलेल्या सगळ्या पिकानं तग धरली.  त्यात साडे पाच एकर उस आहे. दीड एकर भुईमुग आहे. एकरभर भेंडी आहे आणि आमच्या बैलासाठी घासही आहे. आणि आता त्या बोअरच्या जीवावरच माझं उर्वरित सहा एकर क्षेत्र पाण्याखाली आणण्याचं स्वप्नं पहातो आहे.

वडिलांच्या आशीर्वादासारखी ही पोतडी. मी जो पर्यंत शेती करीन तो पर्यंत मला काही कमी पडू देणार नाही असं मला विश्वास आहे.

तात्यांची पोतडी

तात्यांची पोतडी

बाई, बुद्धी आणि शिक्षण

( माफ करा हे सारं लिहिण्यामागे स्त्रियांना कमी लेखणं हा हेतू मुळीच नाही. मला आई आहे. बहिण आहे. बायको आहे. पण त्या सगळ्यात थोड्याफार फरकाने स्त्री मला अशीच जाणवते. तिचा दृष्टीकोन अधिक व्यापक व्हावा हाच हेतू. )

शिक्षणानं माणसाला शहाणपण येतं असं म्हणतात. पण माणसांच्या वृत्ती आणि प्रवृत्ती पाहिल्या कि या विधानावारचा माझा विश्वास उडून जातो. आणि मला शहाणपणाची सांगड संस्कारशी घालावीशी वाटते. झालं असं.

आमच्या सोसायटीत नव्यानंच रंगरंगोटीचं काम केलं होतं. नव्या नवरीला हळद लावावी आणि तिला बोहल्यावर उभं करावं तशा भिंती झकास वाटत होत्या.

भिंती नव्यानंच सजल्या होत्या. पावसाळा नुकताच सुरु झाला होता. बाहेर पाऊस पडत होता. सोसायटीच्या परिसरात आणि पार्किंगच्या पाण्यात खेळण्यात मुलं दंग झाली होती. काहींच्या हात चिखलाचे गोळेही होते. मला कुणीतरी भिंतीवर चिखलाचे गोळे मारलेले दिसले. पावसाच्या मातकट पाण्यात भिजवलेले हाताचे पंजेही भिंतीवर मारलेले दिसले. मुलांवर रागवायला मला फारसं आवडत नाही. पण मुलांनी केलेली हि रंगरंगोटी मला आवडली नाही. त्या रंगकामाच आणि भिंती खराब झाल्याचंही मला फारसं काही वाटलं नसतं. पण हे सारं करण्यामागे त्या मुलाच्या निरागसतेपेक्षा विध्वंसकताच अधिक दिसून आली. सहाजिकच मी मुलांवर ओरडलो.

” कुणीं केलं हे सगळं ? ” एक सात आठ वर्षाचा मुलगा पळाला.

” काका त्या मयूरनं.” सगळी मुलं एका सुरात.

” कुठ रहातो तो ? “मुलं धावतच एका रो हाऊसच्या दिशेनी गेली. मीही त्यांच्या पाठोपाठ.

ही माणसं माझ्या संवादतली नव्हती फारशी. पण तोंड ओळख होती. घरातले सगळेच सुशिक्षित. थोडे हायफाय. हाय क्लास. मी आवाज दिला तशी घराच्या खिडकीतून मुलाची आजी डोकावली.” कोण आहे ?”

” जरा बाहेर या काकू.”

मुलाच्या आजीबरोबर मुलाची आईही बाहेर आली. ” काय झालं ? “

” तुमच्या मुलानं नव्यानं रंग दिलेल्या भिंतीवर कसे चिखलाचे गोळे मारलेत ते पहा जरा.” मी.

” आमचा एकटाच मुलगा होता का तिथे ? ” आजी.

” इतरही मुलं होती तिथ. पण सगळी मुलं तुमच्याच मुलाचं नाव सांगताहेत.” मी.

” ठीक आहे. सांगितलंय त्यानं आम्हाला. त्याचे पप्पा आल्यावर मारतील त्याला. ” मुलाची आई.

” मुलांना मारणं पटत नाही मला. हे तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगायला आलोय. ” मी.

” आमच्याही फोर व्हिलरवर मुलांनी ओरखडे ओढलेत. आम्ही सांगायला गेलो तर त्याच्या आईनं ऐकूनही नाही घेतलं. ” मुलाची आई.

” आहो, माझ्याही गाडीवर ओरखडे ओढलेत मुलांनी. मुलंच आहेत ती असं करणारच पण आपल्याला दिसल्यावर समजवायला नको त्यांना ? ” मी.

” ते कळतंय आम्हाला. ” आई आणि आजी एका सुरात.

त्यांचा सूरच असा होता कि फार तोंडी लागण्यात अर्थ नाही हे माझ्या लक्षात आलं. आणि मी माघारी वळलो.
पण वाटलं. काय फरक पडलाय या बाईत शिक्षणामुळे. समोरची व्यक्ती आपल्याला काय सांगतेय ? ते सांगण्याचा तिचा हेतू काय ? हे का नाही समजावून घेवू शकली ती. मग तिच्या पेक्षा अक्षर ओळख नसलेली आमची बहिणाबाई किती थोर.

कितीही शिकली तरी बऱ्याचदा तिच्यातली स्त्री……….आई………प्रेयसी………बायको……..सून……….. सासू………अशा अनेक छटा तिचा शिक्षण झाकोळून टाकतात. आणि मग तिच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. कालच वर्तमान पत्रात एक सर्वैक्षण वाचलं. ” ७८ % सुना करतात सासवांचा छळ. ” का असं ? म्हाताऱ्या माणसांना , वडिलधाऱ्यांना आपुलकीची वागणूक द्यावी एवढही शहाणपण शिक्षणानं स्त्रीला दिलं नाही का ?

बाबा काठी टाकून द्या

[ या महिन्यात १९ तारखेला बाबादिन ( father ‘s day ) आहे. तेव्हा हि पोस्ट वाचायची टाळू नका. मला माहिती आहे तुम्ही खूप चांगलं वागत असाल आपल्या आई बाबांशी. पण कुणाचं चुकत असेल तर काय करा हे मी सांगायला हवं का ? ]

काही दिवसांपूर्वीची घटना आहे. मी शिवाजीनगरहून कात्रजला निघालो होतो. लाल महालाजवळील चौकात सिग्नलला थांबलो होतो. एक सत्तरीचे गृहस्थ माझ्या जवळ आले आणि मला म्हणाले, ” बाळ , मला चौकात चुकत सोडशील का ? ” मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.

बाबांचं वय सत्तरीच. अंगात जुने मळकट कपडे. त्यावर कोट. पायात जुनाट वहाणा. डोक्यावर शेठी टोपी. सिग्नल सुरु झाला. मी बाबांना घेऊन निघालो. सिग्नलमागून सिग्नल जात राहिले. मी बाबांशी थोड्या-बहुत गप्पा मारल्या. बाबा इंग्रजीचे उत्तम व्यासंगी. माझ्यासारख्या पोस्ट ग्र्याजुएत तरुणाला लाज वाटावी असं इंग्लिश बोलत होते. मला त्यांच्याविषयी आदर वाटला. ‘ त्यांचं ठिकाण आलं कि बाबा सांगतीलच.’ म्हणून मी गाडी चालवत राहिलो. चौकामागून चौक गेले. पण बाबा काही कुठं उतरायचं ते सांगेनात. स्वारगेटच्या सिग्नलला गाडी थांबली. तेव्हा मीच म्हणालो, ” बाबा, तुम्हाला कुठ जायचं ?”

” तू कुठवर जाणार आहेस बाळ ? “

” बाबा, मला कात्रजला जायचं. “

” मग असं कर. मला इथच सोड. मला डाव्या बाजूला जायचं. “

“मी सोडू का तुम्हाला तुमच्या घरापर्यंत ? “

” नको बाळ. जवळच आलंय माझं घर. जाईन मी चालत. थ्यन्क्स. ” म्हणत बाबा उतरले. डाव्या बाजूच्या गर्दीत दिसेनासे झाले.

सिग्नल सुटला म्हणून मीही निघालो. पण डोक्यात प्रश्नाचं मोहळ उठलं होतं.
ज्या बाबांना पुढच्या चौकात उतरायचं होतं ते बाबा इथवर का आले ? मुला असतील न त्यांना ? मग त्यांनी पैसे दिले नसतील का ? कि मुलं पहातच नसतील बाबांना ?

मी मागे पुण्यातल्या निवारा या वृद्धाश्रमात मी माझ्या कवितांचा कार्यक्रम सदर केला होता. त्यात आपल्याला कविता सदर करायची संधी मिळावी यापेक्षा मुलांविना खऱ्या अर्थानं पोरक्या झालेल्या आई बाबांच्या आयुष्यात आनंदाचे चार क्षण आणावेत एवढाच हेतू होता. सगळेच अगदी मंत्रमुग्ध होऊन कार्यक्रम ऐकत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक समाधान आणि कौतुक दिसत होतं. काही स्त्रियांनी माझी आया – माया घेऊन  कडकडून बोटं मोडली. सगळ्यांसोबत काही वेळ गप्पा मारल्या. तेव्हा कळलं इथ यायची कुणालाच हौस नव्हती.

पण………….

कुणाची मुलं अमेरिकेला होती…………
कुणाच्या मुलांना आई बाबांकडे पहायला वेळ नव्हता………..
कुणी त्यांच्या आजारपणाला कंटाळल होतं……….
कुणाला पैसे गेले तरी चालतील पण हि अडगळ घरात नको होती………..
पण असं असूनही कुणाच्याही बोलण्यात आपल्या मुलांविषयी कटुता नाही जाणवली.

का होतं असं ? आई बाबांना आपली जाणीव असते. त्यांची माया असते आपल्यावर. मग आपल्याच मायेला ओहोटी का लागते ? त्यांनी भरवलेल्या चिऊकाऊच्या घासाचा विसर कसा पडतो आपल्याला ? कसे विसरतो आपण त्यांनी आधाराला दिलेलं बोट ? आपल्या आई बाबांनी आपल्यासाठी काय काय केलंय याचा विसर कसा पडतो आपल्याला ?

बरयाच घरात सासू सुनेचं पटत नाही हि वस्तुस्थिती असते.  का ?

सून असो कि मुलगा जेव्हा जेव्हा तुम्हाला घरातल्या वठलेल्या वृक्षावर चिडण्याची रागवण्याची वेळ येईल तेव्हा तेव्हा त्यांनी आपल्या लहानपणी किती कष्ट खाल्ल्यात याचं स्मरण करावं.

त्यांनी जे केलं त्याला आपण ‘ कर्तव्य ‘ असं नाव देणार असुत तर मग आपल्याला आपल्या कर्तव्याचा विसर का पडावा ?

यापेक्षा अधिक काय सांगू !!!!!!

बाबा, father

बाबा, father

तुमचा बाप तुमच्यावर अन्याय करतोय ?

मी लहान होतो तेव्हा माझा बाप माझ्यावर अन्याय करतोय असं मला वाटायचं. त्याचं वागणं चुकीचं नसेल. किंवा मी आज ज्या रीतीनं माझ्या पायावर उभा आहे ते पाहिलं कि वाटतं त्याचं वागणं चुकीचं नव्हताच. पण तरीही मी माझ्या मुलांशी फार कठोरपणे वागू शकत नाही. तरीही माझ्या मुलांना माझं वागणं कठोर वाटत असेल. पण मित्रांनो नाही. प्रत्येक बाप त्याच्या मुलांशी जे काही वागतो ते त्या मुलांच्या उज्ज्वल भावितव्यासाठीच. पण हे आज पटतंय. त्यातूनच ‘ बाबा ‘ ह्या कवितेचा जन्म झाला.

खरंतर तर हि कविता मी माझ्या ब्लॉगवर मागेच पोस्ट केली होती. पुन्हा तीच कविता पोस्ट करतोय म्हणून माझी ‘ नवं लिहिण्याची कुवत संपली कि काय ?’ असा समाज करून घेण्याचं काही कारण नाही. केवळ तेव्हा माझा ब्लॉग मराठी विश्वला जोडलेला नव्हता. म्हणून आज पुन्हा एकदा तीच कविता पोस्ट करतोय.

पुन्हा असं होणार नाही हे निश्चित.

बाबा

मित्रहो गेली काही दिवस माझा मूड बरा आहे. काहीतरी नवं सुचतंय. लिहावसं वाटतंय. भरीस भर म्हणून आजची दुपार निवांत मिळाली. घरातही शांतता होती. मूडही अगदीच प्रसन्न नसला तरी व्याकुळ का असेना पण मूड होता.

पुण्यात संत ज्ञानेश्वारांच्या पालखीच आगमन झालेलं होतं. सकाळी ऑफिसला जातानाच मनात काही भावपूर्ण ओळी आकार घेत होत्या. पण ऑफिसात गेलं कि बऱ्याचदा हे आतल्या आत दाबून टाकावं लागतं.

घरी आल्याबरोबर सकाळी मनात आलेल्या विचारांनीच माझा ताबा घेतला आणि एका दमात ‘ म्हणे विठ्ठल मला….’ हि कविता लिहून झाली.

मागे ‘ बाबादिन ’ किंवा ‘ फादर्स दे ’ या दिवशी मी माझ्या ‘ रे घना ‘ या ब्लॉगसह ‘ अक्कलपुरचे अक्कलराव आणि धमाल ’ या ब्लॉगवरही लेख लिहिला होता. त्या दिवशी –

‘ तुम्ही जेव्हा मान टाकता

तेव्हा बाबा खचत असतो

आधार देता देता तरी

मन मारून हसत असतो.’

या ओळींनी मनात आकार घेतला होता. आज ‘ म्हणे विठ्ठल मला….’ हि कविता पूर्ण झाल्यानंतर लगेच त्या ओळींना समोर घेवून बसलो. खूप खूप आत शिरत गेलो आणि माझी ‘ बाबा ’ हि कविता पूर्ण झाली. आणि आजच्या आज ती ब्लॉगवर टाकतोय.

‘ बाबा ’ आणि ‘ आई ’ हि प्रत्येक मुलाच्या पांगुळगाड्याची दोन चाकं असतात. आपण म्हणजे पुढचं एक चाक. हे पुढचं चाक पुढं जायला हवं असेल तर मागच्या दोन्ही चाकांचा घट्ट आधार हवा.

इथं ‘ आई महान ’ कि ‘ बाबा थोर ’ या वादात मला पडायचं नाही. माझ्या या कवितेतल्या काही ओळी वाचल्यानंतर काही रसिकांना ‘ या गृहस्थाला आईचा मोठेपणा मान्य नसावा ’ असं वाटेल. तसं कुणाला वाटणार असेल तर त्यांनी माझ्या ब्लॉगवरच ‘ आई ’ हे सदर वाचावं.

बाबा

मरण यातना सोसताना

आई जन्म देत असते

आपलं हसू पहात पहात

वेदना विसरून हसत असते.


 

बाबा मात्र हसत हसत

दिवस रात्र खपत असतो

शिस्त लावत आपल्यामधला

हिरवा अंकुर जपत असतो.

 

त्याला कसलंच भान नसत

फक्त कष्ट करत असतो

चिमटा घेत पोटाला

ब्यांकेत पैसा भारत असतो.

 

तुमचा शब्द तो कधी

खाली पडू देत नाही

तुमची हौस भागवताना

पैशाकड पहात नाही

 

तुम्ही म्हणजे त्याची स्वप्नं

तुम्ही म्हणजे त्याचा आभाळ

तुमच्यासाठी गिळत असतो

नामुष्कीची अवघी लाळ.

 

तुम्ही जेव्हा मान टाकता

तेव्हा बाबा खचत असतो

आधार देता देता तरी

मान मारून हसत असतो.

 

तुमच्याकडनं तसं त्याला

खरंच काही नको असतं

तुमचा यश पाहून त्याचं

अवघं पोट भरत असतं.

 

त्याच्या वेदना कुणालाही

कध्धीसुद्धा दिसत नाही

जग म्हणत, “ आई एवढ

बाबा कधी सोसत नाही.”

 

त्याच्या वेदना आपल्याला

तशा कधीच कळणार नाहीत

आज त्याला मागितल्या तर

मुळी सुद्धा मिळणार नाहीत.

 

एक दिवस तुम्हीसुद्धा

कधीतरी बाबा व्हाल

त्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या

स्वप्नांचं आभाळ पहाल

 

तेव्हा म्हणाल, “ आपलं बाबा

खरंच कधी चुकत नव्हता

आपल्यासाठीच आयुष्यभर

रक्तसुद्धा ओकत होता.”

 

तेव्हा सांगतो मित्रांनो

फक्त फक्त एक करा

थरथरणारा हात त्याचा

तुमच्या हातात घट्ट धरा.