तुमचा बाप तुमच्यावर अन्याय करतोय ?

मी लहान होतो तेव्हा माझा बाप माझ्यावर अन्याय करतोय असं मला वाटायचं. त्याचं वागणं चुकीचं नसेल. किंवा मी आज ज्या रीतीनं माझ्या पायावर उभा आहे ते पाहिलं कि वाटतं त्याचं वागणं चुकीचं नव्हताच. पण तरीही मी माझ्या मुलांशी फार कठोरपणे वागू शकत नाही. तरीही माझ्या मुलांना माझं वागणं कठोर वाटत असेल. पण मित्रांनो नाही. प्रत्येक बाप त्याच्या मुलांशी जे काही वागतो ते त्या मुलांच्या उज्ज्वल भावितव्यासाठीच. पण हे आज पटतंय.

त्या वयात कळतच नाही चुकतंय कोण ते. कळत नाही म्हणण्यापेक्षा आपण बरोबरच आहोत. कळत नाही ते आपल्या आई बाबांना. आपल्या वयात तेही असेच वागले असतील. आपल्यासारख्याच चुका केल्या असतील. आपण जसा आज मार खातो ना त्यांचा तसा त्यांनीही मार खाल्ला असेल आपल्या आजोबांचा. पण आज आपल्याला शहाणपण शिकवताहेत. असं ठाम मत असतं आपलं.

पण Continue reading

Advertisements

बाबा काठी टाकून द्या

[ या महिन्यात १९ तारखेला बाबादिन ( father ‘s day ) आहे. तेव्हा हि पोस्ट वाचायची टाळू नका. मला माहिती आहे तुम्ही खूप चांगलं वागत असाल आपल्या आई बाबांशी. पण कुणाचं चुकत असेल तर काय करा हे मी सांगायला हवं का ? ]

काही दिवसांपूर्वीची घटना आहे. मी शिवाजीनगरहून कात्रजला निघालो होतो. लाल महालाजवळील चौकात सिग्नलला थांबलो होतो. एक सत्तरीचे गृहस्थ माझ्या जवळ आले आणि मला म्हणाले, ” बाळ , मला चौकात चुकत सोडशील का ? ” मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.

बाबांचं वय सत्तरीच. अंगात जुने मळकट कपडे. त्यावर कोट. पायात जुनाट वहाणा. डोक्यावर शेठी टोपी. सिग्नल सुरु झाला. मी बाबांना घेऊन निघालो. सिग्नलमागून सिग्नल जात राहिले. मी बाबांशी थोड्या-बहुत गप्पा मारल्या. बाबा इंग्रजीचे उत्तम व्यासंगी. माझ्यासारख्या पोस्ट ग्र्याजुएत तरुणाला लाज वाटावी असं इंग्लिश बोलत होते. मला त्यांच्याविषयी आदर वाटला. ‘ त्यांचं ठिकाण आलं कि बाबा सांगतीलच.’ म्हणून मी गाडी चालवत राहिलो. चौकामागून चौक गेले. पण बाबा काही कुठं उतरायचं ते सांगेनात. स्वारगेटच्या सिग्नलला गाडी थांबली. तेव्हा मीच म्हणालो, ” बाबा, तुम्हाला कुठ जायचं ?”

” तू कुठवर जाणार आहेस बाळ ? “

” बाबा, मला कात्रजला जायचं. “

” मग असं कर. मला इथच सोड. मला डाव्या बाजूला जायचं. “

“मी सोडू का तुम्हाला तुमच्या घरापर्यंत ? “

” नको बाळ. जवळच आलंय माझं घर. जाईन मी चालत. थ्यन्क्स. ” म्हणत बाबा उतरले. डाव्या बाजूच्या गर्दीत दिसेनासे झाले.

सिग्नल सुटला म्हणून मीही निघालो. पण डोक्यात प्रश्नाचं मोहळ उठलं होतं.
ज्या बाबांना पुढच्या चौकात उतरायचं होतं ते बाबा इथवर का आले ? मुला असतील न त्यांना ? मग त्यांनी पैसे दिले नसतील का ? कि मुलं पहातच नसतील बाबांना ?

मी मागे पुण्यातल्या निवारा या वृद्धाश्रमात मी माझ्या कवितांचा कार्यक्रम सदर केला होता. त्यात आपल्याला कविता सदर करायची संधी मिळावी यापेक्षा मुलांविना खऱ्या अर्थानं पोरक्या झालेल्या आई बाबांच्या आयुष्यात आनंदाचे चार क्षण आणावेत एवढाच हेतू होता. सगळेच अगदी मंत्रमुग्ध होऊन कार्यक्रम ऐकत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक समाधान आणि कौतुक दिसत होतं. काही स्त्रियांनी माझी आया – माया घेऊन  कडकडून बोटं मोडली. सगळ्यांसोबत काही वेळ गप्पा मारल्या. तेव्हा कळलं इथ यायची कुणालाच हौस नव्हती.

पण………….

कुणाची मुलं अमेरिकेला होती…………
कुणाच्या मुलांना आई बाबांकडे पहायला वेळ नव्हता………..
कुणी त्यांच्या आजारपणाला कंटाळल होतं……….
कुणाला पैसे गेले तरी चालतील पण हि अडगळ घरात नको होती………..
पण असं असूनही कुणाच्याही बोलण्यात आपल्या मुलांविषयी कटुता नाही जाणवली.

का होतं असं ? आई बाबांना आपली जाणीव असते. त्यांची माया असते आपल्यावर. मग आपल्याच मायेला ओहोटी का लागते ? त्यांनी भरवलेल्या चिऊकाऊच्या घासाचा विसर कसा पडतो आपल्याला ? कसे विसरतो आपण त्यांनी आधाराला दिलेलं बोट ? आपल्या आई बाबांनी आपल्यासाठी काय काय केलंय याचा विसर कसा पडतो आपल्याला ?

बरयाच घरात सासू सुनेचं पटत नाही हि वस्तुस्थिती असते.  का ?

सून असो कि मुलगा जेव्हा जेव्हा तुम्हाला घरातल्या वठलेल्या वृक्षावर चिडण्याची रागवण्याची वेळ येईल तेव्हा तेव्हा त्यांनी आपल्या लहानपणी किती कष्ट खाल्ल्यात याचं स्मरण करावं.

त्यांनी जे केलं त्याला आपण ‘ कर्तव्य ‘ असं नाव देणार असुत तर मग आपल्याला आपल्या कर्तव्याचा विसर का पडावा ?

यापेक्षा अधिक काय सांगू !!!!!!

बाबा, father

बाबा, father

बाबा

मित्रहो गेली काही दिवस माझा मूड बरा आहे. काहीतरी नवं सुचतंय. लिहावसं वाटतंय. भरीस भर म्हणून आजची दुपार निवांत मिळाली. घरातही शांतता होती. मूडही अगदीच प्रसन्न नसला तरी व्याकुळ का असेना पण मूड होता.

पुण्यात संत ज्ञानेश्वारांच्या पालखीच आगमन झालेलं होतं. सकाळी ऑफिसला जातानाच मनात काही भावपूर्ण ओळी आकार घेत होत्या. पण ऑफिसात गेलं कि बऱ्याचदा हे आतल्या आत दाबून टाकावं लागतं.

घरी आल्याबरोबर सकाळी मनात आलेल्या विचारांनीच माझा ताबा घेतला आणि एका दमात ‘ म्हणे विठ्ठल मला….’ हि कविता लिहून झाली.

मागे ‘ बाबादिन ’ किंवा ‘ फादर्स दे ’ या दिवशी मी माझ्या ‘ रे घना ‘ या ब्लॉगसह ‘ अक्कलपुरचे अक्कलराव आणि धमाल ’ या ब्लॉगवरही लेख लिहिला होता. त्या दिवशी –

‘ तुम्ही जेव्हा मान टाकता

तेव्हा बाबा खचत असतो

आधार देता देता तरी

मन मारून हसत असतो.’

या ओळींनी मनात आकार घेतला होता. आज ‘ म्हणे विठ्ठल मला….’ हि कविता पूर्ण झाल्यानंतर लगेच त्या ओळींना समोर घेवून बसलो. खूप खूप आत शिरत गेलो आणि माझी ‘ बाबा ’ हि कविता पूर्ण झाली. आणि आजच्या आज ती ब्लॉगवर टाकतोय.

‘ बाबा ’ आणि ‘ आई ’ हि प्रत्येक मुलाच्या पांगुळगाड्याची दोन चाकं असतात. आपण म्हणजे पुढचं एक चाक. हे पुढचं चाक पुढं जायला हवं असेल तर मागच्या दोन्ही चाकांचा घट्ट आधार हवा.

इथं ‘ आई महान ’ कि ‘ बाबा थोर ’ या वादात मला पडायचं नाही. माझ्या या कवितेतल्या काही ओळी वाचल्यानंतर काही रसिकांना ‘ या गृहस्थाला आईचा मोठेपणा मान्य नसावा ’ असं वाटेल. तसं कुणाला वाटणार असेल तर त्यांनी माझ्या ब्लॉगवरच ‘ आई ’ हे सदर वाचावं.

बाबा

मरण यातना सोसताना

आई जन्म देत असते

आपलं हसू पहात पहात

वेदना विसरून हसत असते.


 

बाबा मात्र हसत हसत

दिवस रात्र खपत असतो

शिस्त लावत आपल्यामधला

हिरवा अंकुर जपत असतो.

 

त्याला कसलंच भान नसत

फक्त कष्ट करत असतो

चिमटा घेत पोटाला

ब्यांकेत पैसा भारत असतो.

 

तुमचा शब्द तो कधी

खाली पडू देत नाही

तुमची हौस भागवताना

पैशाकड पहात नाही

 

तुम्ही म्हणजे त्याची स्वप्नं

तुम्ही म्हणजे त्याचा आभाळ

तुमच्यासाठी गिळत असतो

नामुष्कीची अवघी लाळ.

 

तुम्ही जेव्हा मान टाकता

तेव्हा बाबा खचत असतो

आधार देता देता तरी

मान मारून हसत असतो.

 

तुमच्याकडनं तसं त्याला

खरंच काही नको असतं

तुमचा यश पाहून त्याचं

अवघं पोट भरत असतं.

 

त्याच्या वेदना कुणालाही

कध्धीसुद्धा दिसत नाही

जग म्हणत, “ आई एवढ

बाबा कधी सोसत नाही.”

 

त्याच्या वेदना आपल्याला

तशा कधीच कळणार नाहीत

आज त्याला मागितल्या तर

मुळी सुद्धा मिळणार नाहीत.

 

एक दिवस तुम्हीसुद्धा

कधीतरी बाबा व्हाल

त्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या

स्वप्नांचं आभाळ पहाल

 

तेव्हा म्हणाल, “ आपलं बाबा

खरंच कधी चुकत नव्हता

आपल्यासाठीच आयुष्यभर

रक्तसुद्धा ओकत होता.”

 

तेव्हा सांगतो मित्रांनो

फक्त फक्त एक करा

थरथरणारा हात त्याचा

तुमच्या हातात घट्ट धरा.


‘ फादर्स डे ‘ आणि माझा बाप

काल ‘ फादर्स डे ‘ होता. आणि मला माझे वडील आठवत होते. भयंकर कडक. आजही ते कुठल्याही क्षणी कानाखाली जाळ काढतील अशी भीती वाटते. आज हि परिस्थिती मग मी लहान असताना काय असेल ? विचार करा. तुम्हाला सांगतो मी त्यांच्या डोळ्यासमोर उभा रहायचो नाही. कधी कधी वाटत ते इतके कडक असायला नको होते. पण कधी कधी वाटतं ते इतके कडक होते म्हणूनच आपल्यासारख्या ‘ नाठाळाला ‘ मार्गी लावू शकले. नाही तर आमची नाव कुठल्या किनाऱ्याला लागली असती काही सांगता आलं नसता.

आज मी माझ्या मुलांवर रागावतो, चिडतो, संतापतो, कधी कधी राग अनावर झाला कि एक दोन फटकेही देतो तेव्हा लक्षात येत थोड्याफार प्रमाणात का होईना पण आपल्यात आपला बाप आहे.

माझ्या बापानं माझ्यासाठी काय काय केलं असेल याची तेव्हा मला जाणीव नव्हती. त्यानं कसे कष्ट उपसले असतील हेही कळत नव्हतं. पण आज मी माझ्या मुलांच्या भविष्यासाठी जे काही करतो आहे ते पाहिलं कि लक्षात येत आपल्या बापानही आपल्यासाठी हे सारं केलं असेल. पण हे सारं आज कळतंय. त्या काळी माझा बाप माझ्यासाठी जे काही करत होता त्याची मला जाणीव नव्हती आणि आज मी माझ्या मुलांसाठी जे काही करतो आहे त्याची माझ्या मुलांना जाणीव नसते. पण हे रहाटगाडग  कुठंतरी थांबायला हवं. एका पिढीनं दुसऱ्या पिढीला जाणून घ्यायला हवं.

‘ फादर्स डे ‘ हि संकल्पना मुळात पाश्चात्य तरी ती वाईट नाही. ‘ व्ह्यलेनटायीन डे ‘, ‘ फ्रेन्डशिप डे ‘ या सारख्या पाश्चात्य संकल्पना कशा फोफावल्या आपल्याकडे ? मग ‘ फादर्स डे ‘, ‘ मदर्स डे ‘ या सारख्या गोष्टी का नाही मुळ धरत. या संकल्पना का नाही आपल्या रक्तात शिरत. वर्षातला केवळ एखादा दिवस साजरा करून नाही आपण त्यांच्या उपकरातून मोकळे होऊ शकत. खरंतर त्या ओझ्यातून आपण मोकळे नाही होवूच शकत. पण त्यांनी आपल्या विषयी बाळगलेल्या स्वप्नांची जाणीव ठेवून आपण त्यांना आत्मिक समाधान तरी देवू शकतो ना !

जीवघेण्या यातना सोसून जन्म देणारी आई निश्चितच थोर आहे. तिचा थोरपण साऱ्या जगानं मान्यही केलाय. पण त्या इवल्याशा जीवाला वाढवताना जीवात जीव असेपर्यंत खस्ता खाणारा, राब राब राबणारा बाबा मात्र फारसा कुणाच्या  खिजगणतीतही नसतो. हे कुणाला तरी जाणवलं असेल म्हणून तर आजच्या या दिवसाची टूम निघाली असेल.

पण असा एखादा दिवस साजरा करायचा म्हणून नव्हे तर त्याच्या खस्तांची, त्याच्या राबण्याची, त्यानं आपल्या विषयी बाळगलेल्या स्वप्नांची जाणीव व्हावी म्हणून या दिवसाचं स्मरण करायलाच हवं आणि आपल्या बाबानं झेललेल्या साऱ्या वेदनांशी नतमस्तक व्हायलाच हवं.