किती जणांना कळतो मैत्रीचा अर्थ ?

तुम्ही म्हणाल, ” प्रेमाचं आणि मैत्रीचं गुणगान गाणाऱ्या या माणसानं आज मैत्री दिनी काहीच का लिहिलं नाही.” खरंतर मी १४ फेब्रुवारी या दिवसालाच मैत्री दिवस समजत होतो. आणि आपल्याकडे तोच दिवस खऱ्या अर्थानं मैत्री दिवस म्हणून साजरा केला जातो. पण काल परवा कुठं तरी ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा ‘ जागतिक मैत्री दिवस म्हणून साजरा केला जातो.’ असं वाचलं होतं. पण ‘ १४ फेब्रुवारी हाच खरा मैत्री दिवस ‘ या माझ्या व्याख्येवरून माझी श्रद्धा काही ढळत नव्हती म्हणूनच खास असं काही लिहायचं मनात नव्हतं. पण आज मटा मधल्या काहींच्या मैत्री विषयीच्या व्याख्या वाचल्या आणि लिहायला बसलो.

पण खरंच जागतिक स्तरावर मैत्री दिवस साजरा केला जात असला तरी, खरंच किती जणांना कळतो मैत्रीचा अर्थ ? किंवा प्रत्येकाच्या मनात मैत्रीची एक व्याख्या असते. ती आपापली सोय बघून केली असते. आणि मग अशा व्याख्येला खतपाणी घालणारी व्यक्ती मिळाली कि आपण म्हणतो, “मला खूप छान मित्र मिळालाय.”

आजची मटा मधली अमृता खानविलकरची मैत्रीची व्याख्या मी वाचली आणि हादरलोच. ती म्हणते, ” माझ्यासाठी मैत्रीचा अर्थ आहे……स्वातंत्र्य. मैत्रीत कोणतीही बंधन नसतात.” म्हणजे आपण मैत्री करू या पण तू माझ्यावर कोणतीही बंधनं लादायची नाहीत. मी कुठेही जाईन……..कुणाबरोबरही फिरेन………….मी कुठलंही व्यसन करेन…………आणि कुणाचाही हात धरेन. पण तू काही बोलायचं नाही. जमलं तर तर माझ्या सोबत यायचं नाहीतर तुझ्या वाटेनं निघून जायचं. हे तुला जमणार असेल तर आपण मित्र नाही तर नाही. असं का ?

दीपिका पदुकोन म्हणते, ” मैत्री हा शब्द खूपच स्पेशल आहे. आपण कुणालाही आपले मित्र मैत्रीण मानतो तेव्हा त्या शब्दाचं महत्व जपता यायला हवं.” दीपिकाची हि व्याख्या म्हणजे मला शब्दांचे बुडबुडे वाटले मला.

आज काल नात्याचे सगळेच पदर इतके कुचकामी होत चालले आहेत कि नको वाटतं सारं. अशा वेळी मैत्रीवर तरी किती विश्वास ठेवायचा ? आता तर मैत्रीला सोशल नेटवर्किंगचा एक पदर लाभलाय हजारो मित्र मैत्रिणी भेटतात. नेटवर भेटलेल्या अशाच एका मित्रानं मध्ये पुण्यातल्या एका मुलीला लग्नाची मागणी घातली. तिच्या घरी गेला. आणि चोरी करून पसार झाला.

काय म्हणायचं या मैत्रीला ? का करतात माणसं असं ? काय मिळवतात यातून ?

माणसं अशी का वागत नाहीत ?

हि माझी बऱ्याच दिवसापूर्वी लिहिलेली पोस्ट. ‘ माणसं माणसं झाडासारखी का वागत नाहीत ‘ असा प्रशा मी यात विचारलाय. झाडासारखी म्हणजे कशी ते त्या कवितेत सांगितलेलं आहे.

म्हणूनच मैत्री विषयीही मी –
मैत्रीतही आपल्याला
झाड होता यायला हवं
ऊन अवघा सोसताना
सावली होता यायला हवं

एवढंच म्हणेन.

पण असं ऊन सोसून सावली होणं म्हणजे काय ? तर दुसऱ्याला समजावून घेणं. आता समजून घेणं म्हणजे काय किंवा खरी मैत्री कशी असायला हवी याचं एक उदाहरणच देतो.

पंधरावं सोळावं वर्ष हे मैत्रीची प्रेमाची खऱ्या अर्थानं गरज असणारं वय. या आधी आपल्याला मित्र मैत्रिणी नसतात असं नाही. पण या आधीच्या वयात आपण आई बाबांच्या कुशीतच जास्त रममाण होतो. मित्र मैत्रिणी हवे असतात ते वेगवेगळे खेळ खेळताना सवंगडी म्हणून. पण पंधराव्या सोळाव्या वर्षांनतर मित्र मैत्रीनंची गरज असते ती सुख दुख वाटून घ्यायला. मनातलं मळभ मोकळं करायला.

पण होतं काय ! आपल्याही नकळत मैत्रीचं रुपांतर प्रेमात होतं. तो त्याचं प्रेम त्याच्या मैत्रिणीकडे व्यक्त करतो. आणि प्रेम तर लाभत नाहीच त्याला तिचं पण असलेली मैत्रीही मोडीत निघते. का होतं असं ? कारण ती मैत्रीही खरी नसते. मैत्री खरी असती तर तिनं त्याला समजावून घेतलं असतं आणि प्रेमात न पडताही मैत्रीचं रोपटं अधिक फुलवलं असतं.

मला म्हणायचं ते एवढंच कि, ” तुम्ही मित्र आहात ना एकमेकांचे मग एकमेकांना समजून घ्या. पण कोणत्याही परिस्थितीत मैत्रीचं रोपटं मुळापासून उपटून टाकू नका.”

तुम्ही म्हणाल, ” मैत्री म्हणजे तो आणि ती असंच का मानलत तुम्ही ? तो – तो किंवा ती – ती अशी मैत्री असू शकत नाही का ?”

असू शकते ना पण. पण खरंच आजकालच्या मैत्री दिनाच्या सेलिब्रेशनला तिची आणि त्याची एवढीच मैत्री अभिप्रेत नसते काय ?

Advertisements

शीला तू सुद्धा

इतका एकेरी उल्लेख केलाय म्हणून अनेक जण माझ्यावर संतापतील. कदाचित आमचं पोलीस खातं किंवा एखादा निष्टवान माझ्यावर कायदेशीर कारवाईही करेल. पण करू काय ? सगळीकडूनच आग लागली आहे. विझवायची कोणी ?

स्वातंत्र्यानंतर आदरानं नाव घ्यावं असा नेता मला अजून कोणी दिसला नाही. एकटे अटल बिहारी वाजपेयी त्याला अपवाद. पण त्यांना सत्तेवरून खाली खेचण्यात केवढा पुरुषार्थ वाटला इतरांना. कॉंग्रेसचा तर एकही नेता मला इतका निस्पृह दिसला नाही. थोडंबहुत इंदिरा गांधींना बरं म्हणता येईल. पण त्यांनी सुद्धा जनकल्याणापेक्षा सत्तेच्या राजकारणालाच अधिक महत्व दिलं.

ए राजा काय……..कलमाडी काय……….सगळे एका माळेचे मणी. आपल्याकडे कसं आहे सापडला तो चोर बाकीचे शिरजोर. आणि आम्ही अशा चोरांच्या हाती देश दिलाय.

आईचं काळीज असणाऱ्या स्त्रिया राजकारणात आल्यानंतर परिस्थिती सुधारेल असं वाटलं होतं. त्या तरी जनतेवर पुत्रवत प्रेम करतील अशी अपेक्षा होती.
पण…………

आज दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षितांनी एकतीस कोटींचा घोटाळा केल्याचं वाचलं आणि फार वाईट वाटलं. आता सांगा सगळ्याच गोवऱ्या मसणात गेलेल्या या बाईचा मी असा एकेरी उल्लेख केलाय म्हणून माझं काही चुकलंय.

आपण यातून काही शहाणपणा घ्यावा एवढंच. ‘ आण्णा ‘ सारख्या
समाजसेवकाच्या आंदोलनाला पाठींबा देताना आपण नुसते यसएमयस करून चालणार नाही…………वेळ पडलीच तर रस्त्यावर उतरण्याची सुद्धा तयारी ठेवायला हवी………….. तुरुंग सुद्धा भरायला हवेत…………….आणि रक्त सुद्धा सांडायला हवं. इंग्रजांच्या पाशातून हा देश सोडवताना स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळका यांच्यासह हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी रक्त सांडलं आहे याचा विसर पडून कसं चालेल.