भटकंती

खरंतर मला गावभर फिरण्याची थोडा अधिक चांगला शब्द वापरतो ‘ भटकंतीची ‘ खूप  हौस आहे. पण माझा खिसा नेहमीच खूळखुळत असतो ( हा  शब्द प्रयोगही  वेगळ्या अर्थाने ) म्हणजे माझ्या खिशात फारसे पैसे नसतात या अर्थाने वापरला आहे हे रसिकांनी लक्षात घ्यावं.

सहाजिकच मी माझ्या निवास स्थानापासून पाच – पन्नास किलोमीटरच्या परिसराच्या पलीकडे जाण्याचा फारसा विचार करीत नाही.

एक दिवस मी माझ्या राहत्या घरापासून दोन – तीन किलोमीटरच्या टप्प्यावर असलेल्या एका ठिकाणी गेलो. त्या ठिकाणाला नाव गाव काही नाही. ठिकाण आहे  कात्रज घाटाच्या परिसरातल. ‘ पालवी ‘ या माझ्या संस्थेच्यावतीने आम्ही वृक्षारोपणाच काम करीत होतो. साहजिकच त्या परिसरात काही वृक्षारोपण करता येयील का याची पहाणी करण्यासाठी आम्ही तिथ गेलेलो. दिवस जून अखेरीचे………….पावसाळ्याचे.

आम्ही तिथं गेलो आणि त्या परिसराच्या अक्षरश प्रेमातच पडलो.

तिथं एक छोटासा बंधारा होता.

त्या बंधाराच्या पाटातून वाहणार पाणी, पुढच्या खडकावरून  वाहणाऱ्या त्या पाण्याची फेसाळणारी शुभ्रता.

बस जगण्यासाठी यापेक्षा आणखी काही हवं असतं या गोष्टीचा मला तरी विसर पडला.

त्या परिसरात वृक्षारोपण करून आम्ही घरी परतलो. पण माझ्या मनात एकच विचार……….एकदा सहकुंब इथं यावं याचा.

तो पावसाळा निघून गेला. पुढचा पावसाळा आला आणि एका रविवारी आम्ही त्या दिशेने निघालो.

गाडी शेवटपर्यंत जात नव्हती. एक – दोन किलोमीटर अलीकडे गाडी लावली. पुढे पायीच निघालो. साधारण अर्धा तास चालायचं होत. वाट निसरडी. आजूबाजूला गच्चं हिरवी किलबिल.

गप्पा – टप्पा. विनोद, हशा हे सारं होत होतं. पण या सर्याठी कुठेही पाय घसरणार नाही याची काळजी घेत घेत आम्ही सारे त्या ठिकाणी पोहचलो. आणि माझ्या सोबत असलेले सारे भान हरपून गेले.

खोल झाडीतून कुठूनतरी मोराच्या केकावण्या ऐकू येत होत्या. झाडाझुडपातून कितीतरी पक्षी मजेत इकडे तिकडे फिरत होते. हे ठिकाण कोणाला फारसं माहित नसल्यानं तिथं गर्दीही फारशी नव्हती.

बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला उंच कडे. बंधाऱ्याच्या पाण्याच्या फुगवट्या मागे गच्चं झाडी. आम्हाला इकडं तिकडं फारसं फिरता येत नव्हतं. आणि कुठं फारसं फिरावसही वाटत नव्हतं. आमच्या समोरून खळखळून वाहणाऱ्या पाण्याच दुडदुडन, त्यांचे आळोखे – पिळोखे पाहूनच आम्ही मुग्ध झालो होतो.

मुलं त्या पाण्यात मनमुराद धिंगाणा  घालीत होती.


चांगले चार- सहा तास आम्ही त्या दैवी सुखाच्या सहवासात वावरलो. घरनच बांधून आणलेलं जेवण उरकलं.

आणि आभाळाएवढी झालेली मनं घेवून पुन्हा  घराकडे परतलो.

1 Comment

Leave a comment