मुसक्या बांधायची वेळ आली आहे

किती दिवस खदखदतंय हे सारं माझ्या मनात. खूप चीडचीड होते. अगदी भ्रष्टाचाराच्या विरोधातलं रामदेव बाबांचं आंदोलन उधळलं गेलं तेव्हापासून खूप चडफड होतेय मनाची. वाटत आपण सारे खरंच षंढ आहोत.  सारं गुमान सहन करणारे सत्तेच्या हातातले बाहुले आहोत. जात्याचा खुंटा त्यांच्या हातात आम्ही भरडले जाणारे दाणे.

आणि वर हे अकलेचे तारे तोडणारे कपिल सिब्बल, दिग्विजय सिंग. राजकारणाचा माज सत्ताधाऱ्यांच्या अंगात किती मुरलाय हे क्षणा क्षणाला प्रत्येक पावलाला दिसतंय. हि मंडळी बाह्या सरसावून आणणांवर आणि रामदेव बाबांवर चिखल फेक करीत होती. आणि आम्ही काही करू शकत नव्हतो. करू शकत नव्हतो म्हणण्यापेक्षा करत नव्हतो. पण आता पुरे किती दिवस आपण अशी बघ्याची भूमिका घेणार. हे एक नाही दहा हाताना देशाला लुटणार. शिवाय यांचे हात अदृश्य. नाट्य गोताय्गोत्यांच्या रुपातले. घोटाळ्यांचे यातले बहुतेक आकडे कोटीत. कधी कधी मला वाटतं रावणांना दहा तोंडांनी जेवढं विध्वंस केला नसेल तेवढा विध्वंस हि मंडळी करताहेत.

खरंतर आपण प्रत्येकानेच रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. पण आपण पडलो पोटार्थी. आमच्यातुनच जन्माला आले होते सावरकर, आमच्यातूनच गरजले होते लोकमान्य टिळक, आमच्यातलेच भगतसिंग …राजगुरू….सुखदेव गेले होते फासावर या साऱ्यांचा आम्हाला विसर पडलाय.

politic, राजकारण

नाग आणि गारोडी

आम्ही मतदार आहोत. आम्हीच निवडून देतो हे लोकप्रतिनिधी. पण आम्हाला आमचा तो हक्कही नीट बजावता येत नाही. गोर गरीब मतदान करतात. त्यांची मतं विकत घेतली जातात. पण सुशिक्षित म्हणवणारे आमचा अधिकारही विसरून जातो. पण आता आम्ही असं हात बांधून चालणार नाही. जागं व्हायला हवं. मुसक्या बांधायला हव्यात. आमचे पूर्वज परकीयान विरुद्ध लढले. पण अमेरिकेचा स्वतंत्र लढा घ्या. फ्रेंचची राज्य क्रांती घ्या. तिथल्या जनतेचे हे उठाव स्वकियांविरूद्धच होते. आता आम्हालाही जागं व्हायला हवं. मुसक्या बांधायला हव्यात.

कधी वाटते

आजचं शिर्षक वाचूनच माझ्या मित्रांना नक्की वाटेल कि,  बऱ्याच दिवसानंतर या बाबाचा मूड रोम्यांटिक दिसतोय. आज काही तरी झकास वाचायला मिळणार. खूप झकास नसलं तरी तुम्हाला हवं हवसं असं नक्की आहे.

कधी वाटते पायामधले
तिच्याच आपण व्हावे पैंजण
तिची पावुले झेलून घ्याया
कधी वाटते व्हावे अंगण

मागे मी –

फ्रेशर्स पार्टी : चुकलं कुणाचं ?

हा लेख लिहिला होता. आणि त्यानंतर लगेचच

माझी फ्रेशर्स पार्टी

हा लेख लिहिला होता. दोन्ही हि लेखांमध्ये तरुणाईचंच प्रतिबिंब होतं. एक चुकीच्या मार्गाला लागलेली आणि दुसरी एका झकास ध्येयानं झपाटलेली.

या दुसऱ्या लेखातल्या माझ्या मित्रांनी उभा केलेला ” कधी वाटते ” हा देवेंद्र भोमे या पंचविशीतल्या तरुणाची निर्मिती संकल्पना असलेल्या कार्यक्रमाचा पंधरावा प्रयोग…….

येत्या २८ तारखेला

पुण्यातल्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सादर होतंय.

वेळ आहे रात्री ९.३० ची.

जेष्ठ कवी सुधीर मोघे या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत.

अर्थात सुधीर मोघे कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत म्हणून रसिकांनी हा कार्यक्रम पहावा असं नाही म्हणत मी.

खरंच आपल्याला काहीतरी अगळवेगळं, मनाची निख्खळ करमणूक करणारं असं काही पहायचं असेल तर हा कार्यक्रम पहायलाच हवा.

खऱ्या अर्थानं तरुणाईसाठी असलेला हा कार्यक्रम तरुणांनी तर पहावाच. पण आजच्या तरुण पिढीची समंज किती मोठ्ठी आहे हे जाणून घ्याचं असेल तर मोठ्ठ्यांनीही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहायला हवं.

या कार्यक्रमाची खूप आकर्षणं सांगता येतील. पण……….

नेहमीच वन्समोर घेणारं……..

” भिरभिरणारे वारे श्वासात भरुनी घ्या रे
कधी सा रे ग म गा, कधी ढिंग च्यांग मचाळांग  गा रे “

हे मी लिहिलेलं गीत

आणि……….

‘ देवेन्द्रन केलेलं एक अप्रतिम फ्युजन ‘ यासाठी हा कार्यक्रम एकदा नव्हे पुन्हा पुन्हा पहायला हवा.

लो कट to हाय हिल्स

परवा एक जाहिरात पहिली –

‘ Low Cut to High hill ‘
all fashion on your mobile.

हि जाहिरात पहिली आणि वाटलं हे काय चाललंय आमचं ?

गरज आहे संस्कार आणि संस्कृती जपण्याची आणि आमची सिस्टीम तुम्हाला घरपोच देतेय काय तर  फ्याशन ? म्हणजे आपल्याला हवी आहे भाजी पोळी आणि हे देताहेत बर्गर नाही तर चायनीज ?

बरं हि  फ्याशन तरी कशी तर लो कट्स आणि हाय हिल्सची ? म्हणजे काय तर पोरींचे गळे उघडे पडायचे आणि त्यांच्या टाचा उचलून घ्याच्या ? कशासाठी हे सारं ?  फ्याशनच पोहचवायचीय ना तुम्हला नव्या पिढीपर्यंत तर मग नववारीची पोहचवा………काष्ट्याची पोहचवा………रंगीबेरंगी गळून पडणाऱ्या टीचभर टिकल्यान ऐवजी……….कपाळभर कुंकवाची पोहचवा.

पण नाही आम्ही असलं काही नाही भरवणार त्यांच्या मनात. आम्ही त्यांना शिकवणार लो कट्स आणि हाय हिल्सची सौंदर्याला बेताल करणारी  फ्याशन. त्याशिवाय का आमच्या संस्कृतीचे तीन तेरा आणि नऊ बारा वाजणार ?

स्त्री मुक्तीचा दंडोरा पिटणाऱ्या कित्येकांना माझा हा लेख मोडीत काढावासा वाटेल. पण मी काही स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा सनातनवादी नाही किंवा स्त्रियांनी बुर्ख्यातच वावरायला हवं या कुणा मौलवीच्या फतव्याचा समर्थकही नाही.

स्त्री हि सुंदर दिसावीच. तिच्याकडं पाहिल्यानंतर कुणाही डोळ्यांला सुख लाभावच. याच मताचा मी आहे. पण स्त्रीच्या फ्याशनमुळं एखाद्यातला पशु जागा होणार असेल तर त्या फ्याशनचा काय उपयोग ?

नाही, मी  फ्याशनच्या विरोधात नाही. स्त्रीनं सजाव – धजाव,  सुंदर दिसावं पण…………!!!!!!

निळ्याभोर तलावातल्या चंद्रच प्रतिबिंब पहाण्यात जी मजा आहे ती डबक्यातल्या चंद्रच प्रतिबिंब पहाण्यात नाही हे ज्याचा त्याला कळायला हवं.

बरं !!!!!!!!! हया  फ्याशन कधीही मुलांसाठी नसतात बरं का ? आणि असाव्यात तरी का ? मुलांनी अशी लो कट फ्याशन केली तरी सौंदर्याचा कुठला गाभा दिसणार आहे ? high heels घातले तरी कुठले उभार नजरेत भरणार आहेत ?

आरे, मनाचे श्लोक का नाही धाडत आम्ही नव्या नव्या पिढीच्या मोबाईलवर ? फ्याशन व्यतिरिक्त आणखीही बऱ्याच गोष्टी आहेत ना तरुणांपर्यंत पोहचायला. कुठली पुस्तक वाचायला हवीत ते पोहचवा, नव्या शोधांविषयी माहिती द्या, तरुणांनी कोणत्या प्रकारचं सामाजिक काम करण्याची गरज आहे ते त्यांना सांगा. आमच्या संस्कृतीला आणि संस्काराला सुरंग लावणारी एकही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहचू देऊ नका.

अस झाल तर आमच्या संस्कृतीचा………संस्काराचा आणि आमच्या तरुणाईचा ऱ्हास कधीच होणार नाही.

माझी फ्रेशर्स पार्टी

कालच्या रविवारी मी फ्रेशर्स पार्टीला गेलो होतो.

तुम्ही म्हणाल, ” म्हणजे हा आता नक्कीच एखाद्या पोलीस कोठडीत खितपत पडला असेल.”

पण नाही मित्रांनो ! मी घरीच आहे आणि हा ब्लॉग लिहितोय.

थेऊरच्या पार्टीला ‘ फ्रेशर्स पार्टी ‘ असं कल्पक नाव देणारे तरुण वाया गेलेले असतील, असं म्हणणं किती शहाणपणाचं आहे ?

‘ पार्टी ‘ मग ती कशाचीही असो. अगदी चहाची, भज्याची, डिनरची किंवा कॉकटेल डिनरची. ती पार्टी आपण आपल्या जिवाभावाच्या मित्र – मैत्रिणीन सोबत मस्त एन्जॉय करावी. गप्पा माराव्यात, टाळ्या द्याव्यात, टाळ्या घ्याव्यात, एखाद्याची मस्त फिरकी घ्यावी, कुणीतरी लटक रागवाव, आपण मात्र खूप सिरिअस होऊन त्याची समजूत काढावी…..आणि त्यांना खो खो हसत म्हणावं, ” काय उल्लू बनवला मी तुला. अरे, असं रुसायला मी काही अगदीच बाळ्या नाही.” एवढ सारं झाल्यानंतर मस्त शीळ घालत घरी परतावं.
त्या तरुणांच्या डोक्यातही असेच विचार असावेत. पण आमच्या मिडिया बहाद्दरांनी त्या पार्टीला पार गटारगंगेत बुडवलं आणि त्या तरुणाईचं जगणं अधिकच अवघड करून टाकलं

ते जाऊ द्या. मी माझ्या फ्रेशर्स पार्टीविषयी लिहित होतो. मी फ्रेशर्स पार्टीलाच गेलो असं मी मानतो. कारण तिथून परतताना मी अगदी मनातून फ्रेश होऊन गुणगुणत घरी परतलो होतो.

खरंतर पार्टी नव्हतीच ती. ‘ कधी वाटते ‘ हा मराठी गाण्यांचा  कार्यक्रम होता. रसिकांनी त्यापूर्वी कधीही न ऐकलेल्या, ‘ देवेंद्र भोमे ‘ या पंचविशीच्या तरुणांना संगीतबद्ध केलेल्या मराठी गीतांचा, हिंदी गझलांचा हा कार्यक्रम. मी लिहिलेल्या काही गाण्यांचाही त्यात समावेश होता-

‘ रे घना थांब ना, प्रिया कुठे सांग ना ‘,

‘ भिरभिरणारे वारे श्वासात भरुनी घ्या रे,

कधी सा, रे, ग, म, ग, कधी ढिंग, चांग, मचाळांग गा रे ‘

हि मी लिहिलेली त्यातली काही गाणी. ‘

‘ भिरभिरणारे वारे ‘ ला रसिकांनी ज्या रितीनं ठेका धरून प्रतिसाद दिला ते पाहताना माझ्या डोळ्यात पाणी आलं.  आपलं बाळ नुकतंच स्वतःच्या पायावर उभं राहून चालताना पाहून आईच्या डोळ्यातही पाणी येत ना तसंच माझ्या डोळ्यातही पाणी आलं. आईच्या डोळ्यातल्या त्या पाण्याचा आणि त्या क्षणी माझ्या डोळ्यात आलेल्या पाण्याचा धर्म एकाच असावा असं वाटलं मला तेव्हा.

प्रत्येक रसिकांना तो कार्यक्रम पहायलाच हवा. पण प्रत्येक पुणेकरानंही नक्कीच पाहायला हवा. पण प्रत्येक तरुणानं तर पुन्हा पुन्हा पहायला हवा.  माझी गाणी त्यात आहेत म्हणून नाही सांगत. थेऊरच्या पार्टीत एकत्र आलेल्या तरुणांसारखेच काही  तरुण एकत्र येतात आणि किती सुरेख कार्यक्रम करतात ते सारयांना कळावं म्हणून. अर्थात थेऊरच्या पार्टीचा सतत आठ दिवस पाठपुरावा करणारे आमचे मिडीयावाले त्या तरुणांकडे लवकर वळून पहाणार नाहीत हे मात्र खरं.

वीस – बावीस तरुणांनी एकत्र येऊन साजरा केलेला तो सोहळा. त्याविषयी सविस्तर नंतर लिहीन.

पण आज हे सारं लिहीव वाटलं, कारण कार्यक्रमाहून परतताना हे सारे विचार माझा पाठपुरावा करत होते. वाटलं या तरुणांची हि ‘ फ्रेशर्स पार्टीच नाही काय ?

थेऊरच्या पार्टीत सहभागी झालेल्या तरुणांना असा एखादा कार्यक्रम दाखवून सांगायला हवं, ” मित्रांनो, तुमच्यासारखे हे तरुण. हे जर इतकं सुरेख काही करू शकतात, तर तुम्ही नाही का असं काही करू शकणार !”