बाबा

मित्रहो गेली काही दिवस माझा मूड बरा आहे. काहीतरी नवं सुचतंय. लिहावसं वाटतंय. भरीस भर म्हणून आजची दुपार निवांत मिळाली. घरातही शांतता होती. मूडही अगदीच प्रसन्न नसला तरी व्याकुळ का असेना पण मूड होता.

पुण्यात संत ज्ञानेश्वारांच्या पालखीच आगमन झालेलं होतं. सकाळी ऑफिसला जातानाच मनात काही भावपूर्ण ओळी आकार घेत होत्या. पण ऑफिसात गेलं कि बऱ्याचदा हे आतल्या आत दाबून टाकावं लागतं.

घरी आल्याबरोबर सकाळी मनात आलेल्या विचारांनीच माझा ताबा घेतला आणि एका दमात ‘ म्हणे विठ्ठल मला….’ हि कविता लिहून झाली.

मागे ‘ बाबादिन ’ किंवा ‘ फादर्स दे ’ या दिवशी मी माझ्या ‘ रे घना ‘ या ब्लॉगसह ‘ अक्कलपुरचे अक्कलराव आणि धमाल ’ या ब्लॉगवरही लेख लिहिला होता. त्या दिवशी –

‘ तुम्ही जेव्हा मान टाकता

तेव्हा बाबा खचत असतो

आधार देता देता तरी

मन मारून हसत असतो.’

या ओळींनी मनात आकार घेतला होता. आज ‘ म्हणे विठ्ठल मला….’ हि कविता पूर्ण झाल्यानंतर लगेच त्या ओळींना समोर घेवून बसलो. खूप खूप आत शिरत गेलो आणि माझी ‘ बाबा ’ हि कविता पूर्ण झाली. आणि आजच्या आज ती ब्लॉगवर टाकतोय.

‘ बाबा ’ आणि ‘ आई ’ हि प्रत्येक मुलाच्या पांगुळगाड्याची दोन चाकं असतात. आपण म्हणजे पुढचं एक चाक. हे पुढचं चाक पुढं जायला हवं असेल तर मागच्या दोन्ही चाकांचा घट्ट आधार हवा.

इथं ‘ आई महान ’ कि ‘ बाबा थोर ’ या वादात मला पडायचं नाही. माझ्या या कवितेतल्या काही ओळी वाचल्यानंतर काही रसिकांना ‘ या गृहस्थाला आईचा मोठेपणा मान्य नसावा ’ असं वाटेल. तसं कुणाला वाटणार असेल तर त्यांनी माझ्या ब्लॉगवरच ‘ आई ’ हे सदर वाचावं.

बाबा

मरण यातना सोसताना

आई जन्म देत असते

आपलं हसू पहात पहात

वेदना विसरून हसत असते.


 

बाबा मात्र हसत हसत

दिवस रात्र खपत असतो

शिस्त लावत आपल्यामधला

हिरवा अंकुर जपत असतो.

 

त्याला कसलंच भान नसत

फक्त कष्ट करत असतो

चिमटा घेत पोटाला

ब्यांकेत पैसा भारत असतो.

 

तुमचा शब्द तो कधी

खाली पडू देत नाही

तुमची हौस भागवताना

पैशाकड पहात नाही

 

तुम्ही म्हणजे त्याची स्वप्नं

तुम्ही म्हणजे त्याचा आभाळ

तुमच्यासाठी गिळत असतो

नामुष्कीची अवघी लाळ.

 

तुम्ही जेव्हा मान टाकता

तेव्हा बाबा खचत असतो

आधार देता देता तरी

मान मारून हसत असतो.

 

तुमच्याकडनं तसं त्याला

खरंच काही नको असतं

तुमचा यश पाहून त्याचं

अवघं पोट भरत असतं.

 

त्याच्या वेदना कुणालाही

कध्धीसुद्धा दिसत नाही

जग म्हणत, “ आई एवढ

बाबा कधी सोसत नाही.”

 

त्याच्या वेदना आपल्याला

तशा कधीच कळणार नाहीत

आज त्याला मागितल्या तर

मुळी सुद्धा मिळणार नाहीत.

 

एक दिवस तुम्हीसुद्धा

कधीतरी बाबा व्हाल

त्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या

स्वप्नांचं आभाळ पहाल

 

तेव्हा म्हणाल, “ आपलं बाबा

खरंच कधी चुकत नव्हता

आपल्यासाठीच आयुष्यभर

रक्तसुद्धा ओकत होता.”

 

तेव्हा सांगतो मित्रांनो

फक्त फक्त एक करा

थरथरणारा हात त्याचा

तुमच्या हातात घट्ट धरा.


7 Comments

Leave a comment