लिंबू – टिंबू

मला आठवतंय मी लहान होतो तेव्हा आमच्या खेळात एखादं लहान पोर लिंबू – टिंबू असायचं.

विटी – दांडू खेळताना या लिंबू – टिंबूला विटी जेवढी लांब गेली असेल त्या अंतराच्या अर्धीच लंगडी घालावी लागायची.

गोट्या खेळताना त्याला अर्ध्या अंतरावरूनच चकायला दिलं जायचं.

क्रिकेट खेळताना त्याला हाप पीच बॉलिंग टाकली जायची.

त्याच्यावर सारखं सारखं राज्य आलं कि ते आमच राज्य न देता पळून जायचं.

याला म्हणतात लिंबू – टिंबू.

त्यामुळंच परवा जेव्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉनटिंगनं केनिया,  क्यानडा यासारख्या संघांना लिंबू टिंबू म्हणाला तेव्हा मला फार वाईट वाटलं.

याच केनियान सेमीफायनल पर्यंत मजल मारली होती याचा पॉनटिंगला विसर पडला कि काय ? आणि भल्या भल्या संघांनाही आपण ७० – ८० रनात आउट होताना पाहिलं नाही काय ? १९८१ ला झिम्बाब्वेन भारताची ५ बाद १७ अशी केलेली अवस्था कोण विसरलं असेल ? आणि तेव्हाच भारतानं विश्वचषक जिंकलाच ना ! आणि हा विश्वकप आम्ही जिंकला तेव्हा आमचा देश तरी कुठे असा क्रिकेटमधला वाघ होता ! कुणी सांगाव पुढचा वर्ल्डकप केनिया किंवा नेदरल्यांडही जिंकेल.

फुटबॉलच्या कितीतरी आधीपासून क्रिकेट खेळ खेळला जातोय पण तरीही फुटबॉलच्या विश्वचषकात सामील होणारे संघ २५ च्या वर आणि  क्रिकेटच्या विश्वचषकात आत्ताशी कुठे १४ संघ सामील होताहेत. आणि त्यातल्याही काही संघांना आम्ही लिंबू टिंबू म्हणतोय.

त्यामुळेच माझी आयसीसीला अशी नम्र विनंती आहे कि, या कथित दुबळ्या संघांना असं एकेकी क्रिकेटमधून हद्दपार करू नये. फार तर या संघांविरूद्धचे सामने संपूर्ण ५० षटकांच्या ऐवजी २५ षटकांचे खेळवले जावेत. अर्थात रिकी पॉनटिंगसह सर्वच कर्णधारांची आणि देशांची याला संमती मिळायला हवी हे नक्कीच.

जे हसतील…..

ऑस्ट्रेलियानं कितीतरी वर्ष क्रिकेटचे निर्विवाद बादशहा म्हणून क्रिकेट जगतावर राज्य गाजवलं. कठोर प्ररीश्रामानंतर जिगरबाज भारतीयांनी ऑस्ट्रेलियाची ती सत्ता हस्तगत केली.

अगदी श्रीलंकन खेळाडून पासून सगळ्यांनीच या स्थानावर पोहचण्याची योग्यातच नाही अशी मुक्ताफळं उधळली. श्रीलंकन कर्णधारानं तर, ” आयसीसी च्या क्रमवारीचे निकर्षच चुकीचे आहेत. म्हणून भारतीय संघाला विश्व विजेते या स्थानापर्यंत पोहचता आलं.” अशी दर्पोक्ती केली.

दक्षिण आफ्रिकेत पोहचल्यानंतरही यजमान संघाला किरकोळातच जमा धरलं होतं. आणि खरंच किरकोळ असल्या प्रमाणं भारतीय संघ पहिली कसोटी हरला. पण ज्या ऐटीत भारतीय संघानं दुसरी कसोटी जिंकली त्यातून केवळ, ” खरोखरच आम्हीच नंबर वन आहोत. ” हेच नव्हे तर ” दक्षिण आफ्रिकेनं पहिली कसोटी जिंकली ती केवळ योगायोगांच.” हेच सिद्ध केलं.

परवा एका वेस्ट इंडियन खेळाडूच, ” ऑस्ट्रेलिया संघाची अवस्था वेस्ट इंडियन संघापेक्षाही दयनीय झालीय.” असा विधान वाचलं.

पण इतिहास साक्षी आहे कि भल्या भल्या सत्ता लयाला गेल्या. पातशाही गेली………निजामशाही गेली……मोगलाई गेली……….तसंच आज नंबर वनवर असणारा संघ कायम त्याच स्थानावर राहील याची शाश्वती कोण देवू शकेल.

त्यामुळेच भारतीय संघानं जग्गाजेते असल्याचा माज कधी  केला नाही आणि यापुढेही कधी आमचा संघ तसा माज करेल असं मला वाटत नाही.

पण तूर्तास तरी कोणीही भारतीय संघाची हेटाळी करू नये. होणार काही नाही जे हसतील त्यांचेच दात दिसतील.

आपल्या संघाचं हे स्थान साऱ्यांच्याच डोळ्यात किती खुपतंय त्याचा अगदी ताजं उदाहरण म्हणजे भारतीय संघानं पहिली कसोटी हरल्यानंतर मोठ्या दिमाखात दुसरी कसोटी जिंकली. खरंतर तिसरीही कसोटी आपण जिंकणार होतो. पण ती कसोटी आपल्याला अनिर्णीत अवस्थ्येत सोडून द्यावी लागली. त्याच वेळी इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला खडे चारले आणि दक्षिण आफ्रिकेचा एकेकाळचा स्टार गोलंदाज शॉन पोलॉक म्हणला, ” इंग्लंडचा  संघच आता भरतीय संघाला त्यांच्या स्थानावरून खाली उतरवू शकेल.”

” का रे बाबा तुम्हाला जमलं नाही म्हणून आता त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवताय का ? ”

आणि आता तर पहिली वन डे हरल्यानंतर भारतीय संघाना ज्या रीतीनं पुढच्या दोन्ही वन डे जिंकल्या त्या नंतर तर कुणाला बोलायला फारशी जागाच उरणार नाही.

सेहवाग, गंभीर, सचिन असे खंदे वीर संघात नसताना ज्या रीतीनं भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेत पाणी पाजलंय ते पाहिल्यानंतर तर, आम्ही २०११ चा क्रिकेटचा विश्वकप जिंकणारच हे सांगायला कोण ज्योतिष विशारदाची गरज नाही.

शेवटी मारली

मिटिंग होती. ऑफिसहून यायला साडेआठ नऊ वाजले. तरीही पोरानं केलेला अभ्यास पहिला………….त्यानं सोडवलेली गणित तपासली. त्याला न सुटणार गणित सोडवलं. मग पुन्हा तेच गणित उलटं करून सोडवलं. कुठल्याही गोष्टीनं डोक्याला ताप दिला कि तिला असं उलटं सुलट करायला मला फार आवडतं.

मग जेवायला बसलो. आणि झाली match ची आठवण. टि.व्ही. लावला तर परिस्थिती चांगली. ४० ओव्हरात साउथ आफ्रिकेच्या फक्त १९६ धावा. पण विकेट गेलेल्या फक्त ४. आयला म्हणालं, “आता जर यांनी रेटायला सुरवात केली तर पावणे तीनशेच्या घरात सहज जातील.”

पण कि र्र र्र तिन्ही सांजेला आपण ओढ्याकाठी जाव. तिथल्या भयाणतेत हडळीची किंवा पारावरच्या मुंजाची आठवण व्हावी. भीतीनं अंगावर काटा उभा रहावा……….पाय लटपट कापायला लागावेत आणि समोर चक्क पांढऱ्या शुभ्र झग्यातली परी उभी रहावी तसं झालं. आफ्रिकेचा डाव २२० धावत संपला. मी खुश.

आता म्हणालं, ” निम्मीच म्याच पाहू.”

मुरली विजयला संघात कोण घेतं कळत नाही. यड्यासारखा आउट झाला.

विराट कोहली आणि रोहित शर्मा ऐन रंगात आले आणि बाद झाले.

नेहमी खिंड लढवणारा बाजी प्रभू देशपांडे लगेच धारातीर्थी पडला.

कालच्या match मध्ये फार्मात असणारा युवराज आजच्या match मध्ये फार्मात असेलच असं काही सांगता येत नाही

मग रैना आणि पठाण लागले. पठाण तर बोथाच्या एकाच षटकात १९ रना कुटून धमाल आणली. आता म्हणालं match जिंकणार. पण कसलं काय पठाण गेला. याला म्हणतात अवसान घातकी पणा. पाठोपाठ रैनाही गेला.

मग लढायला कोणीच नाही. आणि जिंकायला रना हव्या होत्या जवळ जवळ ५०.

आफ्रिकेचा २४ धावात झालेला खुर्दा पहिला होता. आता म्हणाल, ” कसलं जिंकतोय ? ”

पण मारली ना राव match  तीही २ विकेट राखून.    .

श्रीलंकन विकृती

भारताला विजयासाठी ५ धावांची गरज.

सेहवागला शतकासाठी एका धावेची गरज.

गोलंदाज – रणदिव.

फलंदाज – सेहवाग.

षटकातला पहिला चेंडू आणि ……………४ बाईज.

आता भारताला विजयासाठी एका धावेची गरज.

सेहवाग ९९ वर रेंगाळलेला.

दुसरा चेंडू धव नाही.

तिसरा चेंडू धाव नाही.

चौथा चेंडू …………….

सेहवागचा षटकार.

रणदिवचा नोबॉल.

निकाल –

भारताचा विजय.

सेहवागचं हुकलेलं शतक.

पहिल्या चेंडूवर ४ बाईज गेल्या हे मी समजू शकतो.

का कुणास ठाऊक ? पण रणदिव पुढचा चेंडू नोबॉल किंवा वाइड  टाकून सेहवागला शतकापासून दूर ठेवणार असंच मला वाटत होतं.

आणि झालंही तसंच. त्यानं चौथा चेंडू वाइडच टाकला. आणि सेहवागचा षटकार हवेतच राहिला. त्याच्या धावांना काही तो जोडला गेला नाही.

रणदिवची कसली हि विकृती ?

कुणी म्हणेल, ” तो चुकूनच नोबॉल पडला असेल.”

पण नाही. त्यांना ज्यारितीनं रेषेच्या पुढे येऊन चेंडू टाकला ते पाहिलं कि  लक्षात  येत त्यानं अगदी जाणिवपूर्वक नोबॉल टाकला होता.

काही लोकांना इतरांचं चांगलं पहावत  नाही हेच खरं.

हि एक विकृतीच. पण अशी विकृती खेळत तरी असू नये.

एवढीच अपेक्षा.

सेहवाग लगे रहो. आत्ता हुकवलेल शतक पुढल्या वेळी करून दाखव.